मजुरांना स्थानिक ठिकाणीच काम उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 11:41 AM2020-05-11T11:41:22+5:302020-05-11T11:41:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोळदा व दुधाळे येथे जलसंधारण दिनाचे औचित्य साधून गाव तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोळदा व दुधाळे येथे जलसंधारण दिनाचे औचित्य साधून गाव तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते करण्यात आला. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मजुरांना आपल्या गावातच काम मिळावे, या हेतूने कामाला सुरुवात करण्यात आली.
कोरोना विषणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संपूर्ण देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. यात मजुरांच्या हाताला काम मिळेनासे झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मजुरांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध कामे हाती घेतली आहेत. आज महाराष्ट्र जलसंधारण दिनाचे औचित्य साधून नंदुरबार तालुक्यातील कोळदा येथील मजूरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने गाव तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कोळदा येथील १७५ तर दुधाळे येथील ९७ मजुर उपस्थित होते. त्यांना याठिकाणी महिनाभर पुरेल एवढे काम उपलब्ध होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, नंदुरबार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक पटाईत, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश वळवी, सुभाष राजपूत, ग्रामविस्तार अधिकारी भैय्या निकम, ग्राम विकास अधिकारी संजय देवरे, ग्रामसेवक गणेश मोरे यांच्यासह अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पालन करून हे काम सुरू करण्यात आले आहे. मजुरांना कामाच्या ठिकाणी तोंडाला रुमाल बांधूनच काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. सुरक्षित अंतर ठेवून काम करताना स्वत:ची व परिवाराच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहनही केले.
जिल्हाभरात रोजगार हमी योजनेची विविध कामे सुरू करण्यात आली असून, मजुरांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५९७ ग्रामपंचायतींपैकी ३९३ ग्रामपंचायतींमध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे सुरू आहेत. त्यात वैयक्तिक लाभाची ४ हजार १६९ कामे सुरू असून, येथे १५ हजार ४२० मजूर कामावर आहेत. तर २०१ सार्वजनिक कामांवर ५ हजार ३६२ मजूर कार्यरत आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण ४,३७० कामांवर २० हजार ७८२ मजूर उपस्थित आहेत. उर्वरित मजुरांनाही कामे उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाकडून ग्रामपंचायत पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मजुरांनी आपल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधून रोजगार उपलब्ध करून घ्यावा.