हाजीरा ते सेंधवा रेल्वे मार्गाचे काम त्वरित सुरू व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 12:29 PM2020-07-02T12:29:50+5:302020-07-02T12:30:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खापर : गुजरातमधील हाजीरा बंदर ते मध्यप्रदेशातील सेंधवा जंग्शनपर्यंतच्या ३०९ किलो मीटर प्रस्तावित ब्रॉड गेज रेल्वे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
खापर : गुजरातमधील हाजीरा बंदर ते मध्यप्रदेशातील सेंधवा जंग्शनपर्यंतच्या ३०९ किलो मीटर प्रस्तावित ब्रॉड गेज रेल्वे लाईनचा नकाशा व त्यात समाविष्ट शहरांची यादी सद्या जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून चर्चेत आली असून, या प्रस्तावित रेल्वे मार्गाचे काम त्वरित होण्यासाठी पाठपुरावा व्हावा, अशी मागणी परिसरातील जनतेतून होत आहे.
गेल्या चार ते पाच दिवसापासून व्हॉट्स अॅप या सोशल मीडियावर प्रस्तावित हाजिरा जंग्शन ते मांडवी मार्गे महाराष्ट्रातून थेट मध्यप्रदेशातील सेंधव्यापर्यंत रेल्वेलाईन टाकण्यात येणार आहे. तसा नकाशादेखील सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यासाठी केंद्रसरकारतर्फे कुठलीही नोटीफिकेशन काढण्यात आलेली नाही किंवा रेल्वेविभागानेदेखील जाहिरात दिलेली नाही, असे असताना असा नकाशा टाकून बनवाबनवी केली जात आहे की, काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
संबधित प्रस्तावित नकाशात हाजिरा ते सेंधवा या ३०९ किलोमीटरच्या रस्त्यावर रेल्वेलाईन टाकली जाणार असून, यासाठी तीन हजार कोटी रूपये खर्च येणार आहे. गुजरात, महाराष्ट्र व मध्यप्रदेश या तीन राज्यांना जोडणारी ही रेल्वेलाईन असणार असून, हाजीरा-गोठण-कठोर-बोधन-मांडवी-उमरपाडा-देवमोगरा-सागबारा-सेलंबा-अक्कलकुवा-तळोदा-शहादा-खेतीया व सेंधवा अशी ही प्रस्तावित रेल्वे लाईन असणार आहे. त्यामुळे ट्रायबल झोनला फायदा होणार असून, दुर्गम अतिदुर्गम व अविकसित भागाचाही विकास होणार आहे.
या रेल्वे लाईनमुळे परिसरातील दोन कोटी लोकांना नोकरी व रोजगाराच्या संधी प्राप्त होणार असून, स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या रेल्वेलाईनला धार्मिक स्थळे जसे रामेश्वर-देवमोगरा व सेंधवा ही तिर्थक्षेत्रे विकसित होतील व त्यामुळे सुद्धा रोजगार उपलब्ध होतील. तापी व नर्मदा या नद्यांच्यामधून ही रेल्वेलाईन टाकली जाणार असून, मोठ-मोठ्या पुलांची निर्मिती करावी लागणार नाही. कारण नर्मदेच्या नदीवर आधीच पुलांची निर्मिती करण्यात आलेली असून, त्यावरुन वाहतुक सुरूच आहे.
ही रेल्वेलाईन ब्रॉडगेज एकेरी असणार असून, मनमाड-धुळे-इंदौर या लाईनीला सेंधवा जंग्शनला जोडली जाणार आहे. मनमाड-धुळे-इंदौर या रेल्वेलाईनच्या कामाला मंजुरी मिळाली असून, कामाला प्रारंभ झाला आहे. तर हाजिरा ते सेंधवा हा मार्ग प्रतावित असल्याचे नकाशात दाखविण्यात आलेले आहे. जर का ही रेल्वेलाईन टाकण्यात आली तर नंदुरबार जिल्हा दोन्ही बाजुंनी रेल्वे ट्रॅकने जोडला जाईल व त्यामुळे व्यापार उद्योगासाठी जिल्ह्याचा उत्तर भाग भरभराटीला येऊ शकेल.
या रेल्वेट्रॅकमुळे अक्कलकुवा, तळोदा व शहादा या तिन्ही तालुक्यात व्यापारासाठी पोषक वातावरण निर्मिती होऊ शकणार आहे. गुजरातेतील सुरत, अंकलेश्वर, अहमदाबाद, बडोदा या शहरांमध्ये रेल्वेद्वारे कमी भाड्यात मालाचीने-आण करणे सोयीचे होणार आहे तर मध्यप्रदेश राज्यातील सेंधव्यापर्यंत रेल्वेलाईन जोडल्या गेल्यानंतर इंदौर व इतर शहरांमध्ये मालाची ने-आण करणे शेतकरी व व्यापारी या दोघांसाठी सोयीचे होणार आहे. गुजरातेतील नोकरदारासाठी एस टी बसच्या प्रवासापेक्षा स्वस्त व कमी वेळात प्रवास होणार असल्याने सर्वांनाच आता हा प्रस्तावित रेल्वेमार्ग हवा हवासा वाटू लागला आहे. हा रेल्वेमार्ग होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावे, अशी मागणी यानिमित्ताने होऊ लागली आहे.