तापी जन्मोत्सवानिमित्त प्रकाशा येथे पूजाविधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:24 AM2021-07-17T04:24:31+5:302021-07-17T04:24:31+5:30
तापी जन्मोत्सवानिमित्त महिलांनी उपवास केला. सकाळी केदारेश्वर मंदिर, तापी नदीघाट तर काही महिला भाविकांनी संगमेश्वर महादेव मंदिर येथे ...
तापी जन्मोत्सवानिमित्त महिलांनी उपवास केला. सकाळी केदारेश्वर मंदिर, तापी नदीघाट तर काही महिला भाविकांनी संगमेश्वर महादेव मंदिर येथे तापी नदीत जाऊन स्नान केले. स्नान झाल्यावर तापी नदीचे पूजन करून आरती केली. त्यानंतर सोळा शृंगार व साडीचोळी अर्पण केली. गेल्या अनेक वर्षांपासून गढी परिवारातील मीराबाई चौधरी यांच्या घराण्यात तापी जन्मोत्सवाला तापी नदीत स्नान करून देवीला साडीचोळी अर्पण करतात. आजही त्यांनी तो पूजाविधी सुरू ठेवला आहे. त्यांनी संगमस्थळी जाऊन तापी नदीची पूजाविधी केली. दिवसभर भाविकांनी येत पूजाविधी केला.
तापी नदीचा उगम मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतातील बैतुल जिल्ह्यातील मुलताई गावाजवळ आषाढ शुद्ध सप्तमीला प्रकट झाली. मुलताई (मूळ तापी) नावावरून तापी झाली. तापी वऱ्हाड प्रांतातून धार, नशिराबाद, मेळघाट, बऱ्हाणपूरमार्गे महाराष्ट्रात मुक्ताईनगर, भुसावळ, सारंगखेडा, प्रकाशा, गुजरात राज्यातील कुकरमुंडा, सुरत व पुढे अरबी समुद्रात जाऊन मिळते. असा तीन राज्यांतून तापी नदीचा प्रवास जातो. तापी जन्मोत्सवाच्या दिवशी तापी नदीत स्नान केल्याने मोठे पुण्य मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
मी बालपणापासूनच तापी जन्मोत्सवाला तापी नदीत स्नान करून पूजाविधी करते. तापीमातेला साडीचोळी अर्पण करते. गेल्या ५० ते ५५ वर्षांपासून दर तापी जन्मोत्सवाला मी आवर्जून तापीमातेचे दर्शन घेते व साडीचोळी अर्पण करते, ते आजही सुरू आहे.
-मीराबाई पाटील, प्रकाशा