यंदा ११ लाख क्विंटल साखर उत्पादन, गेल्या वर्षांच्या तुलनेत कमी उत्पादन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 08:24 AM2019-03-16T08:24:46+5:302019-03-16T08:25:38+5:30
जिल्ह्यातील तीन पैकी दोन साखर कारखान्यांनी आपला गळीत हंगामाचा समारोप केला आहे.
नंदुरबार : जिल्ह्यातील तीन पैकी दोन साखर कारखान्यांनी आपला गळीत हंगामाचा समारोप केला आहे. नवापूरचा आदिवासी साखर कारखानादेखील येत्या पाच दिवसात बंद होणार आहे. त्यामुळे यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा साखर उत्पादन कमी झाले आहे. आतापर्यंत १० लाख ८० हजार क्विंटल साखर उत्पादन झाले असून आणखी किमान २० ते २५ हजार क्विंटल उत्पादन होण्याची शक्यता आहे.
खान्देशात केवळ नंदुरबार जिल्ह्यातच तीन साखर कारखान्यांनी यंदाही गाळप हंगाम सुरू केला होता. या तिन्ही साखर कारखान्यांनी आपल्या क्षेत्रातील नोंदीचा व बिगर नोंदीचा सर्व ऊस गाळप केला. पूर्ण क्षमतेने हे कारखाने सुरू राहिले. तरीही गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी साखर उत्पादन झाले आहे. पुढील वर्षी ऊस कमी राहणार असल्यामुळे साखर कारखान्यांपुढे अडचणींचा डोंगर उभा राहण्याची शक्यता आहे.
असे झाले गाळप
नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा साखर कारखाना सर्वात जुना साखर कारखाना आहे. या कारखान्याची गाळप क्षमता दैनंदिन पाच हजार मे.टन ऊस गाळपाची आहे. कारखान्याने यंदा १२२ दिवस गाळप हंगाम घेतला. एकूण तीन लाख ८८ हजार ८७६ मे.टन ऊस गाळप केले. त्यातून तीन लाख ९५ हजार ८०० क्विंटल साखर उत्पादन झाले. सरासरी साखर उतारा १०.३१ टक्के मिळाला आहे.
खाजगी तत्त्वावरील आयान शुगर कारखान्याची गाळप क्षमतादेखील दैनंदिन पाच हजार मे.टन इतकी आहे. कारखान्याने यंदा १२७ दिवस गाळप केले. कारखान्याला चार लाख ७३ हजार ७७५ मे.टन ऊस गाळपासाठी मिळाला होता. त्यातून कारखान्याने पाच लाख नऊ हजार ९३० क्विंटल साखर उत्पादन घेतले. कारखान्याचा सरासरी साखर उतारादेखील १०.७६ टक्के इतका मिळाला.
आदिवासी साखर कारखान्याचा गाळप हंगाम अद्याप सुरू आहे. आणखी किमान पाच दिवस हा कारखाना गाळप करणार आहे. कारखानन्याची दैनंदिन गाळप क्षमता अडीच हजार मे.टन इतकी आहे. या कारखान्यानेदेखील यंदा पूर्ण क्षमतेने गाळप केले आहे. आतापर्यंत हा कारखाना १३३ दिवस चालला आहे. एकूण एक लाख ७२ हजार ९३३ मे.टन ऊस गाळप करून एक लाख ७४ हजार ४०० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.
कारखाना सध्या दररोज सरासरी दीड हजार मे.टन पर्यंत ऊस गाळप करीत आहे. सरासरी साखर उतारादेखील १०.२० पर्यंत मिळाला आहे. आणखी पाच दिवसात कारखाना कार्यक्षेत्रात उरलेला सर्व नोंदीचा व बिगर नोंदीचा ऊस कारखाना गाळप करूनच बंद होणार आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी
यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी साखर उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी ऊसाची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर होती. त्यामुळे कारखाने एप्रिलच्या मध्यापर्यंत चालले होते. परिणामी साखर उत्पादन साडे अकरा लाख क्विंटलपेक्षा अधीक झाले होते. यंदा जेमतेम ११ लाख क्विंटलपर्यंत साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. याला कारण अपुरे पर्जन्यमान आणि पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस तोडसाठी केलेली घाई असल्याचे बोलले जात आहे.
पुढील वर्षी बिकट स्थिती
यंदा दुष्काळी स्थिती, शेतातील विहिर, कुपनलिका आटल्याने यंदा शेतकऱ्यांनी ऊस लागवड कमी प्रमाणात केली आहे. पावसाळ्यात होणारी लागवड किती आणि कशी राहते यावरदेखील पुढील गाळप हंगाम अवलंबून राहणार आहे. पुढील वर्षी ऊस कमी राहणार असल्यामुळे ऊस मिळविण्यासाठी साखर कारखान्यांना कसरत करावी लागणार आहे. शिवाय बाहेरच्या कारखान्यांकडून ऊस पळवापळवीचा प्रयत्नदेखील होण्याची शक्यता आहे.
ही बाब लक्षात घेता पुढील हंगाम साखर कारखाने लवकर सुरू करून जास्तीत जास्त ऊस मिळविण्यासाठी तिन्ही साखर कारखान्यांचा प्रयत्न राहण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. शिवाय ऊस क्षेत्र कमी राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला मागणी वाढून भावदेखील समाधानकारक मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गाळप हंगामाची सुरुवात वादानेच...
साखर कारखान्यांचा यंदाचा गाळप हंगामाची सुरुवात वादानेच झाली होती. उसाला योग्य भाव मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले होते. काही दिवस ऊसतोड बंद ठेवण्यात आली होती. या कारणावरून वादविवाद होऊन प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंतदेखील गेले होते. नंतर मात्र कारखाने सुरळीत सुरू राहिले. साधारणत: चार महिने कारखाने सुरू राहिले. सर्वच साखर कारखान्यांनी आपल्या परिसरातील सर्वच ऊस गाळप केल्यानंतरच कारखान्याचा गाळप हंगामाचा समारोप केला आहे. यामुळे शेतकºयांमध्येदेखील समाधान व्यक्त करण्यात येत आहे.