कोरोनासंगे यंदा दशामाता उत्सव रंगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 12:14 PM2020-07-21T12:14:26+5:302020-07-21T12:14:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यंदा दशामाता उत्सव साजरा होत आहे. सोमवारी मातेची घरोघरी स्थापना करण्यात आली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यंदा दशामाता उत्सव साजरा होत आहे. सोमवारी मातेची घरोघरी स्थापना करण्यात आली. दरवर्षी वाजत-गाजत मिरवणुकीद्वारे मातेची मूर्ती नेली जात होती. यंदा मात्र त्याला फाटा देण्यात आला आहे. तरीही कुटूंबातील सदस्यांनी मूर्ती घेऊन जाण्यासाठी गर्दी केल्याचे काही ठिकाणी दिसून आले.
आषाढ अमावस्येपासून अर्थात श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून दहा दिवस दशा माता उत्सव साजरा केला जातो. गुजरातमध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. गुजरातच्या सिमेवर नंदुरबार जिल्हा असल्याने जिल्ह्यात देखील हा उत्सव साजरा केला जात असतो. गेल्या काही वर्षांपासून त्याचे प्रमाण वाढले आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर उत्सवाला मर्यादा आली आहे. घरगुती स्वरूपात हा उत्सव साजरा करण्याचे आवाहन यापूर्वीच करण्यात आले होते. त्याचे पालन भाविक करतांना दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून मातेची मूर्ती घरोघरी नेली जात आहे. दरवर्षी मिरवणुकीने आणि डिजे व बॅण्ड लावून मूर्ती नेली जाते. यंदा या सर्वांवर बंदी असल्याने तसेच गर्दी न करण्याच्या सुचना असल्याने मिरवणुकांना फाटा देण्यात आल्याचे दिसून येत आहे. सोमवारी सकाळी अनेक भागातूून कुटूंबांनी एकत्र येत बाजारातून मूर्ती नेली. मूर्ती नेतांना काहींनी गर्दी केली तर काहींनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केल्याचे दिसून आले. आता दहा दिवस उत्सव साजरा होणाऱ्या घरांमध्ये उत्साह व धार्मिक वातावरण राहणार आहे.
दहाव्या दिवशी मूर्तीचे विसर्जन केले जाणार आहे. त्यासाठी देखील मिरवणूक काढता येणार नसल्याचे स्पष्ट आहे.