यंदा दांडियासह देवीचा जागरही नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 03:44 PM2020-10-02T15:44:21+5:302020-10-02T15:44:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवरात्रोत्सवात राहणारी गरबा, दांडियाची धूम यंदा राहणार नाही, देवीचा जागरलाही मर्यादा राहणार आहेत. नंदुरबारची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवरात्रोत्सवात राहणारी गरबा, दांडियाची धूम यंदा राहणार नाही, देवीचा जागरलाही मर्यादा राहणार आहेत. नंदुरबारची प्रसिद्ध खोडाई देवीची यात्राही भरणार नाही. देवीच्या दर्शनासाठी मुभा राहणार असली तरी त्यासाठी मात्र विविध नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. कोरोनामुळे या सर्व मर्यादा घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदाचा नवरात्रोत्सव दांडिया विनाच राहणार असल्याचे स्पष्ट आहे.
कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा नवरात्रौत्सव, दुगार्पुजा, दसरा हे उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने नागरिकांनी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे. सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी मंडळांनी नगरपालिका, स्थानिक प्रशासन यांची त्यांच्या धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबत धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. या वर्षी शक्यतो पारंपारीक देवीच्या मुर्तीऐवजी घरातील धातू, संगमवर आदी मुर्तींचे पूजन करावे.
मुर्ती शाडूची/पर्यावरण पूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे. उत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा.
कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच प्रत्यक्ष सण सुरु होण्याआधी नवीन काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे. यावर्षीचा नवरात्रौत्सव शांततेत व सुस्थितीत पार पाडण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
- नवरात्रोत्सवात नंदुरबारातील खोडाईमाता मंदीर परिसरात भरणारा यात्रोत्सव आकर्षण असतो. नऊ दिवस भरणारी ही यात्रा शहरवासी आणि तालुकावासीयांच्या दृष्टीने एक आनंद पर्वणी असते. यंदा मात्र यात्राही भरणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
- या यात्रेच्या माध्यमातून अनेक लहान, मोठ्या व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध होत असतो. त्यातून लाखो रुपयांची उलाढाल देखील होत असते. सायंकाळी सहा वाजेपासून भरणारी ही यात्रा नऊ दिवस चालते.
- कोरोनामुळे यंदा यात्रोत्सव भरण्यावर मर्यादा आहेत. त्यामुळे यशवंत विद्यालयाचे मैदान देखील उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. फूलहार, पुजेचे साहित्य विक्री करणाऱ्यांनाही परवाणगी राहणार नाही.
- मंदीरात दैनंदिन पूजाविधी, आरतीसह इतर सर्व धार्मिक कार्यक्रम होतील. भाविकांना देखील दर्शनासाठी सुविधा राहील, परंतु त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आणि कोरोनाचे इतर सर्व नियम पाळणे आवश्यक राहणार आहे.
- प्रशासन आणि पोलिसांचे सर्व बाबींवर लक्ष राहणार आहे. भाविकांनी देखील या संकट काळात मदत व सहकार्य करणे आवश्यक आहे
- गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी रक्तदानासारखे आरोग्य विषयक उपक्रम, शिबीरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू आदी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे पालन करण्यात यावी. देवीच्या दर्शनाची सुविधा आॅनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.
- देवीच्या मंडपांमध्ये निर्जंतुुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारिरिक अंतराचे (फिजिकल डिस्टंसिंग) तसेच स्वच्छेतेचे नियम (मास्क, सॅनीटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे.