तीन दिवसात २ हजार टन युरिया मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 12:52 PM2020-07-23T12:52:58+5:302020-07-23T12:53:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कृषी विभागाकडून येत्या चार दिवसात मागणी केलेला २ हजार ३०० टन युरिया मिळण्याची शक्यता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कृषी विभागाकडून येत्या चार दिवसात मागणी केलेला २ हजार ३०० टन युरिया मिळण्याची शक्यता आहे़ तीन टप्प्यात जिल्ह्यासाठी रॅक येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ यामुळे टंचाई काही अंशी दूर होण्याचा दावा करण्यात आला आहे़
गुरूवार ते शुक्रवार या दोन दिवसात साधारण १ हजार ४०० टन खतांची आवक होण्याची शक्यता आहे़ एका कंपनीने युरिया रॅक पाठवला असल्याची माहिती आहे़ तर शनिवारनंतर सलग दोन दिवस प्रत्येकी ४५० टन युरियाचे दोन रॅक प्राप्त होणार आहेत़ यातून जिल्ह्यात २ हजार टन युरियाची गरज भागवली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़
शहादा
शहादा तालुक्यात सर्वाधिक पेरणी क्षेत्र असून खतांचा वापर आणि मागणीही अधिक असते़ परंतू तूर्तास तालुक्यात किमान अडीच हजार टन खतांचा तुटवडा आहे़ तालुक्यात खाजगी विक्रेते आणि खरेदी विक्री संघ यांच्याकडे शेतकरी दर दिवशी युरियाची मागणी नोंदवत आहेत़
अक्कलकुवा
तालुक्याच्या दुर्गम भागातील शेतकरी सातत्याने खतांसाठी फिरफिर करत आहेत़ तालुक्यासाठी किमान १ हजार टन युरिया आवश्यक आहे़ बहुतांश ठिकाणी युरिया उपलब्ध नसल्याने शेतकरी परत फिरुन जात आहे़ दुर्गम भागातील शेतकरी दरदिवशी अक्कलकुव्यात येऊन रिकाम्या हाताने परत जात आहेत़ या शेतकऱ्यांना दोन दिवसात खत उपलब्ध करुन देण्याची अपेक्षा आहे़
धडगाव
तालु्क्यातील विविध भागात झालेल्या पेरण्यासाठी ७०० टन युरियाची आवश्यकता असल्याची माहिती आहे़ शेतकऱ्यांना यापूर्वीही कमी प्रमाणात युरिया मिळाला आहे़ दुर्गम भागातील शेतकरी युरियासाठी शहादा, अक्कलकुवा आणि तळोदा तालुक्यातील विविध भागात जावे लागत आहे़