दुचाकी अपघातात शिरुडचा युवक ठार
By admin | Published: February 10, 2017 12:30 AM2017-02-10T00:30:44+5:302017-02-10T00:30:44+5:30
शहादा-अनरदबारी : एक जखमी, अज्ञात वाहनाची धडक
शहादा : शहादा ते सावळदा फाटय़ादरम्यान रिलायन्स पेट्रोल पंपासमोर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एक युवक जागीच ठार, तर दुसरा जखमी झाल्याची घटना गुरुवारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील शिरुड दिगर येथील ललित शशिकांत निकुंभे (22) व दीपक राजेंद्र महिरे (22) हे दोन्ही जण दुचाकीने (क्रमांक एमएच-39-आर-4957) सावळदा फाटय़ावरून शहाद्याकडे येत होते. रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ दोंडाईच्याकडे जाणा:या अज्ञात वाहनाने ओव्हरटेक करताना दुचाकीला जबर धडक दिली. त्यात ललित निकुंभे याच्या डोक्यावरून अज्ञात वाहनाचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर दीपक महिरे याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर शहादा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नंदुरबार येथे हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक राकेश पाटील, सुनील पाटील आदींनी पालिकेत भेट देऊन मदत केली.
शहादा ते अनरदबारी या रस्त्यावर अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूला खड्डे व रस्ता अरुंद असल्याने वारंवार अपघात होत आहेत. या रस्त्यादरम्यान असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ गेल्या सहा महिन्यांपूर्वी ट्रॅक्टर ट्रॉलीला ट्रकने धडक दिल्याने सहा महिला मजूर ठार झाल्या होत्या. गुरुवारीही त्याच ठिकाणी दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने युवकाचा मृत्यू झाला. आठवडाभरापूर्वी याच रस्त्यावरील मित्तल फायबर्ससमोर दुचाकी अपघातात दोन जण ठार झाले होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले खड्डे बुजवून रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)