सारंगखेड्याच्या युवा संशोधकाने बळीराजाचा जीव वाचवण्यासाठी तयार केले ‘ऑक्सी जेली’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 09:19 AM2019-01-04T09:19:44+5:302019-01-04T09:46:44+5:30
पिकाला जीव लावून त्याचे पोटच्या अपत्याप्रमाणेच सांभाळ करणाऱ्या असंख्य शेतकऱ्यांचा मृत्यू हा पिकावर फवारणी करताना झाल्याच्या घटना राज्यासह देशात घडल्या आहेत.
- जितेंद्र गिरास
सारंगखेडा : पिकाला जीव लावून त्याचे पोटच्या अपत्याप्रमाणेच सांभाळ करणाऱ्या असंख्य शेतकऱ्यांचा मृत्यू हा पिकावर फवारणी करताना झाल्याच्या घटना राज्यासह देशात घडल्या आहेत. यावर उपाययोजना करण्यात आजवर कोणत्याही प्रकारच्या प्रभावी उपाययोजना नसल्याने घटना थांबलेल्या नाहीत. या घटना थांबाव्यात यासाठी आता जेली तयार करण्यात आली असून सारंगखेडा ता. शहादा येथील युवकाने हे औषध तयार केले आहे.
केतन थोरात असे या युवा संशोधकान हा शोध लावला असून तो मूळचा सारंगखेडा ता. शहादा येथील रहिवासी आहे. पवई येथील आयआयटी या संस्थेतून पदवी शिक्षण पूर्ण करणारा केतन सध्या बंगळुरू येथील इन्स्टिट्युट फॉर स्टेमसेल, बायोलॉजी अॅण्ड रिजनरेटिव्ह मेडिसीन या संस्थेत तो पीएचडीचे शिक्षण घेत आहे़ केतन थोरात याच्यासोबतच प्रवीणकुमार वेमुला, सतीश चंद्रशेखर हे युवा संशोधकांचाही या शोधात मोलाचा वाटा आहे. पिके, फळझाडे यावर किटकनाशक फवारणी करताना शेतकरी आणि शेतमजूर यांना दृष्टी गमवावी लागण्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत.
या घटना थांबवण्यासाठी काय करता, येईल यातून जेली तयार करण्याच्या विचाराने जन्म घेतल्याचे केतन थोरात याने सांगितले. यातून सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ परिश्रम घेत संशोधक सहका-यांच्या सहाकार्याने ‘पॉली ऑक्सीम’ नावाचे जेल तयार केले आहे. फवारणी अगोदर हे जेल अंगाला लावून फवारणी केल्यास कीटकनाशकाचा दुष्परिणाम शेतकरी व शेतमजुर यांच्यावर होत नाही. हे जेल शेततळ्यांसाठी वरदान ठरणार असल्याचे प्रयोगांद्वारे सिद्ध झाल्यानंतर या जेलला पेटंटसाठी पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले़ आहे़
पॉली ऑक्सिग हे जेल किटक नाशकाला त्वचेद्वारे शरीरात घुसू देत नाहीत, किटक नाशकातील ऑग्रेनोफॉस्फेटला निष्क्रिय करून मज्जासंस्थेतील ऑसिरिक्टोनिस्ट्रेस नावाच्या विकाराची मात्रा स्थिर ठेवते. त्यामुळे विषारी द्रव्य त्वचेत प्रवेश करू शकत नाहीत कापसासह सर्व प्रकारच्या पिकांवर फवारण्यात येणा-या कीटकनाशके व बुरशीनाशकांच्या विषबाधेपासून हे जेल संरक्षण करणार असल्याचे यापूर्वीच समोर आले आहे़ केतन व त्याच्या सहाका-यांनी या जेलीवर स्वामित्त्व कायम रहावे म्हणून शासनाकडे पेटंट अर्ज सादर केले असून वर्षभरात अर्ज मंजूर होणार आहे.
केवळ जेलीवरच न थांबता युवा संशोधक केतन याने शेतक-यांसाठी विषबाधेपासून संरक्षण करेल असा कोटही संशोधित केला आहे. कापडात अनक्लेओफीस डेटोक्सीफेर्स नावाचे केमिकल मिश्रित करून हा कोट तयार केला असून माफत दरात तो कोट उपलब्ध करुन देण्याचा त्याचा प्रयत्न राहणार आहे़ पॉली ऑक्सी नावाचे हे जेल सर्व प्रकारची कीटक नाशके व देशात व्यापारीदृष्ट्या वापरात येणा-या सर्व प्रकारच्या किटकनाशकांच्या विषबाधेपासून मानवाचे संरक्षण करेल. सकाळी जर हे जेल अंगाला लावले तर दिवसभर हे विषबाधेपासून संरक्षण करते. विविध चाचण्यांसाठी परवानगी मिळाली असून, येत्या वर्षभरात हे जेल बाजारात उपलब्ध होईल अशी माहिती आहे़
आई-वडिलांना यश समर्पित
केतन थोरातचे पहिली ते चौथीचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा अनरद, ता.शहादा येथे झाले. पाचवी ते आठवीचे आर. एस. विद्या मंदिर अनरद तर नववी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण विकास हायस्कूल शहादा येथे झाले. बीएससी फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे झाले. तर पवई (मुंबई) येथून त्याने आयआयटीचे शिक्षक घेतले आहे. केतनचे वडील विलास थोरात हे खाजगी नोकरी करतात व तर आई के.व्ही. थोरात या सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेविका या पदावर सेवा देत आहेत. महाराष्ट्रात व देशात शेतकरी व शेतमजुरांच्या होणा-या विषबाधेमुळे दुर्घटना मनाला हेलावून गेल्या. तेव्हाच मनाचा निर्धार करून जगाच्या पोसींद्यासाठी काही तरी केले पाहिजे. या निर्धारानेच हे यश प्राप्त झाले. हे यश आई-वडील व शेतक-यांना समर्पित केल्याची भावना थोरात याने व्यक्त केली.