फिट इंडिया फ्रिडम रनमध्ये धावले युवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:32 AM2021-09-26T04:32:30+5:302021-09-26T04:32:30+5:30
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सुदृढ आणि सक्षम भारताच्या निर्मितीसाठी जिल्हा प्रशासन आणि नेहरू ...
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सुदृढ आणि सक्षम भारताच्या निर्मितीसाठी जिल्हा प्रशासन आणि नेहरू युवा केंद्र, नंदुरबार यांच्यातर्फे आज सकाळी ‘फिट इंडिया फ्रिडम रन २.०’ चे आयोजन करण्यात आले होते. यात नंदुरबारकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
‘फिट इंडिया फ्रिडम रन’ची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयापासून झाली. सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे नोडल अधिकारी प्रा. डॉ. माधव कदम, नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी अर्श कौशिक, कार्यक्रम अधिकारी डॉ. मनोज शेवाळे, डॉ. ए. आर. भुयार आदी उपस्थित होते.
सहायक जिल्हाधिकारी श्रीमती करनवाल म्हणाल्या की, युवा पिढी सुदृढ राहण्याच्यादृष्टीने प्रधानमंत्री यांनी ‘फिट इंडिया’ उपक्रम हाती घेतला आहे. देशातील युवक देशाचा आधारस्तंभ असून, उद्याचा सुदृढ भारत निर्माण व्हावा, यासाठी आज तरुणांनी शरीर स्वास्थ्याचे महत्त्व ओळखावे. देशभरात साडेसात कोटी युवक आज या अभियानात सहभागी होत आहेत.
पोलीस अधीक्षक पाटील म्हणाले की, युवा पिढीत आरोग्याविषयी जागरूकता वाढावी. प्रत्येकाने सुदृढ आणि तंदुरुस्त राहण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. स्वतःसाठी, देशासाठी फिट राहण्यासाठी धावणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रा. डॉ. कदम यांनी प्रास्ताविकात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा करताना फिट फॉर फ्रिडमची माहिती सांगितली.
जिल्हाधिकारी कार्यालयापासून मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून दौडला सुरुवात झाली. टोकर तलावमार्गे पुन्हा पोलीस कवायत मैदानावर या दौडचा समारोप झाला. पोलीस अधीक्षक पाटील यांनी ‘फिट इंडिया’ची उपस्थितांना शपथ दिली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजनेत दिल्ली येथे राजपथावर महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या कॉन्टिजन्ट कमांडर प्रतीक कदम, नेहरू युवा केन्द्र संघटनात उत्कृष्ट काम केल्याबद्दल गणेश ईशी, राष्ट्रीय कलाकृतीत राष्ट्रीय पातळीवर पोहोचलेला आदर्श संगपाळ, तसेच राष्ट्रीय छात्र सेनेत उत्कृष्ट काम केल्याबद्दल पंकज राऊत, भावेश पाटील, राष्ट्रीय सेवा योजनाचे जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. कदम, कार्यक्रम अधिकारी, डॉ. मनोज शेवाळे, लेप्टनन्ट डॉ. व्ही. झेड. चौधरी, कॅप्टन विलास वाघ, राहुल पाटील, अर्श कौशिक यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडक विद्यार्थ्यांना या दौडमध्ये प्रवेश देण्यात आला होता.