कटलेला मांजा उचलत युनूसने पिंजले नंदुरबार शहर : इजा टाळण्यासाठी पुढाकार
By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Published: January 16, 2018 01:12 PM2018-01-16T13:12:48+5:302018-01-16T13:13:05+5:30
संतोष सूर्यवंशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : संपूर्ण नंदुरबारकर रविवारी मंकरसंक्रांतीच्या आनंदात रममान झाले होते, शहरातील घरांवरील छते, टेकडय़ा, उंच भागावर पतंग उडविण्याच्या आनंदात सर्व गुंग असताना ‘ते’ मात्र संपूर्ण शहरात पायी फिरुन पतंग उडविताना कटलेल्या मांजाचे संकलन करीत होता़ ‘त्यांनी’ सायंकाळकाठी तब्बल 15 किलो मांज्याचे संकलन केल़े
ही गोष्ट आहे, नंदुरबारातील चिराग गल्ली येथे राहत असलेल्या युनूस खान यांची़ नंदुरबार शहर गुजरातेला लागूनच असल्याने साहजिकच गुजरातेतील अनेक सांस्कृतिक परंपरेचा परिणाम येथेही जाणवत असतोच़ त्यामुळे संक्रांतीनिमित्त येथे होत असलेल्या पतंगोत्सवाचे आकर्षण काही औरच असत़े परंतु या उत्सवाला अनेक वेळा नायलॉनच्या मांजामुळे गालबोट लागण्याचीही शक्यता असत़े म्हणूनच की काय, युनूस हे मकरसंक्रांतीच्या दिवशी संपूर्ण शहरात फिरुन रस्त्यावर पडलेला, कुठे तारेत लटकलेला मांजा गोळा करुन त्याची विल्हेवाट लावत होत़े युनूस प्रत्येक संक्रांतीला हा उपक्रम करीत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आल़े
विशेष म्हणजे ते कुठल्याही सामाजिक संघटनेशी किंवा कुठल्याही फाऊंडेशनचे सदस्यदेखील नाहीत़ स्वयंस्फूर्तिने ते ‘एकला चलो रे’ च्या भूमिकेतून हे कार्य करीत आहेत़ पतंगोत्सवात अनेक वेळा मांजामुळे गळ्याला इजा होण्याच्या प्रकारात मोठी वाढ झाली आह़े त्यामुळे युनूस खान करीत असलेल्या या कार्याला विशेष महत्व प्राप्त झाले आह़े