अडीच कोटींच्या दरोडय़ातील आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:58 PM2018-10-13T12:58:35+5:302018-10-13T12:58:40+5:30
24 तासात कारवाई : पाच संशयितांसह एक कोटी 35 लाख जप्त
नवापूर : दरोडय़ातील पाच संशयीतांना एक कोटी 35 लाख रुपयांसह जेरबंद करण्यात अवघ्या 24 तासात जिल्हा पोलिसांना यश आले आहे. गुरुवारी दुपारी नवापूरनजीक सहा जणांनी चाकू व रिव्हाल्वरचा धाक दाखवून ही रक्कम लूटली होती. यामुळे खळबळ उडाली होती. संशयीतांना सुरत व मेहसाना येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
घटना घडताच पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक रमेश पवार यांनी घटनास्थळी भेट देवून तपासाला दिशा दिली होती. एलसीबीचे निरीक्षक किशोर नवले, नवापूरचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत व सहायक पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाच पोलीस पथक तयार करून म्हैसाणा, सुरत व जळगांवच्या दिशेने रवाना करण्यात आले. संशयित आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या इनोव्हा कारचा मागोवा घेत पाच आरोपींना लुटून नेलेल्या रकमेसह ताब्यात घेण्यात पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत व सहका:यांना यश आले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, लुटीच्या घटनेत सहा जणांचा सहभाग होता. त्यापैकी पाच जण पोलीसांच्या ताब्यात आले असून एक कोटी 22 लाख रुपये त्यांच्याकडुन हस्तगत करण्यात आले आहेत. सहाव्या आरोपीकडे काही रक्कम असल्याची कबुली त्या पाच जणांनी दिली. पोलीस पथक त्यांच्या मागावर आहेत. रक्कम वाहुन नेत असलेल्या टाटा सफारी वाहनातून 13 लाख रुपये पोलिसांना मिळुन आले असल्याने दोन कोटी 41 लाख 50 हजार रुपयांपैकी पोलीसांनी एक कोटी 35 लाख रुपये ताब्यात घेतले आहेत. सफारी वाहनाचे दोन चालक व त्यांचा एक साथीदार हे म्हैसाणा येथील राहणारे आहेत.
घटना दिवसा अकरा वाजता घडली असतांना रात्री साडेनऊ वाजता घटनेची फिर्याद दिली जाते या संशयावरून तपास हाती घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व नवापूर पोलीसांनी बारा तासाच्या आत गुन्ह्याचा छडा लावल्याचे ते म्हणाले. जिल्हा पोलीस दलाला मान खाली करावयास लावणा:या या घटनेचा ऐतिहासिक कामगिरी असा उल्लेख करीत त्यांनी आनंद व्यक्त केला. बालाजी एटरप्राइजेस जळगांव यांच्याकडुन पाठविण्यात येणारी भलीमोठी रक्कम त्यांचीच किंवा अन्य कुणाची याचाही तपास पोलीस करीत आहेत असे ते म्हणाले. आंगडियाची रक्कम वाहुन नेण्यासाठी सफारी गाडीत आसनाखाली एकुण चार ठिकाणी रक्कम ठेवण्यासाठी कप्पे बनविण्यात आले आहेत.
एलसीबीचे निरीक्षक किशोर नवले, नवापूरचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत व सहायक पोलीस निरीक्षक दिपक पाटील, दिगंबर शिंपी, धनंजय पाटील, पोलीस उप निरीक्षक संदिप पाटील, शिवाजी नागवे, पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा पवार, महेंद्र नगराळे, योगेश थोरात, प्रविण मोरे, अनिल राठोड, शांतिलाल पाटील, आदिनाथ गोसावी, जितेंद्र तोरवणे, हितेश पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सुभाष तमखाने, प्रमोद सोनवणे, विकास पाटील यांच्यासह स्थानिक पोलीसांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी परिश्रम घेतले.