तारुण्यातील जिल्हा परिषद अनुभवतेय राजकीय वेगळेपणातील निवडणूक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 12:43 PM2020-01-05T12:43:40+5:302020-01-05T12:43:45+5:30
मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अवघे वय वर्ष २१ असलेल्या नंदुरबार जिल्हा परिषदेने तारुण्यात प्रवेश केला ...
मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अवघे वय वर्ष २१ असलेल्या नंदुरबार जिल्हा परिषदेने तारुण्यात प्रवेश केला आहे. पाचव्या पंचवार्षिक निवडणुकीला सामोरे जातांना जिल्हा परिषदेने अनेक चढउतार पाहिले आहेत. राजकीयदृष्टया पाचवी निवडणूक मात्र अनेक अंगांनी वेगळेपण जपत आहे. आतापर्यंतच्या चारही निवडणुकांमध्ये सरळ लढती होत्या यावेळी प्रथमच तिरंगी व चौरंगी लढती रंगत आहेत. निकालानंतर मात्र सत्तेसाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये ओढाताण राहील असेच आजचे एकुण राजकीय चित्र दिसून येत आहे.
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या दृष्टीने २१ वर्षाचा कालखंड विकासाच्या व राजकीयदृष्टया नवीन आकार घेणारा आहे. यंदाची निवडणूक त्याचीच झलक असल्याचे दिसून येत आहे.
नंदुरबार जिल्हा परिषदेची स्थापना १९९८ साली झाली. पहिली निवडणूक नोव्हेंबर १९९८ मध्ये झाली. त्याकाळी जिल्हाभरात काँग्रेस हाच एकमेव प्रबळ पक्ष होता. त्यामुळे सहाजिकच पहिल्या निवडणुकीत ९० टक्के सदस्य हे काँग्रेसचे निवडून आले. पहिल्या अध्यक्षा होण्याचा मान माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावीत यांच्या कन्या कै.हेमलता गावीत यांना मिळाला.
त्यानंतर दुसरी निवडणूक नोव्हेंबर २००३ मध्ये झाली. त्यावेळी काँग्रेसला राष्टÑवादी काँग्रेस हा प्रबळ विरोधी पक्ष म्हणून समोर उभा ठाकला. परंतु काँग्रेसचे ग्रामिण भागातील संघठन लक्षात घेता यावेळी देखील ७५ टक्के सदस्य काँग्रेसचेच निवडून आले आणि अध्यक्ष रमेश गावीत झाले. या पंचवार्षीकमध्ये मात्र, जिल्ह्यातील राजकारणात बऱ्याच घडामोडी झाल्या. तत्कालीन मंत्री व विद्यमान आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी जिल्हाभरात आपल्या कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले. काँग्रेसला पर्याय म्हणून राष्टÑवादी पक्ष सक्षमपणे उभा केला. त्याचा परिणाम नोव्हेंबर २००८ च्या निवडणुकीत दिसून आला. काँग्रेसचा पराभव करीत राष्टÑवादीने जिल्हा परिषदेवर सत्ता मिळविली आणि आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या पत्नी कुमुदिनी गावीत या अध्यक्षा झाल्या. पुर्ण पंचवार्षीक त्यांच्याकडेच अध्यक्षपद कायम राहिले. नोव्हेंबर २०१३ च्या निवडणुकीत मात्र काँग्रेस व राष्टÑवादीत अटीतटीची लढत होऊन काँग्रेसने सत्ता काबीज केली. त्याच्या दुसºयाच वर्षी केंद्रीय व राज्य पातळीवर राजकीय घडामोडी घडून राष्टÑवादी बॅकफूटवर जावून भाजप प्रबळपणे समोर आला.
यंदाचे खिचडी राजकारण
यंदाच्या निवडणुकीत मात्र जिल्हा परिषद खिचडी राजकारणाचा अनुभव घेत आहे. भाजपने पुर्ण ५६ गट व सहाही पंचायत समिती मिळून ११२ गणात उमेदवार दिले आहेत. त्या खालोखाल काँग्रेस, शिवसेना व राष्टÑवादीने उमेदवार दिले आहेत. यामुळे सर्वच ठिकाणी सरळ लढत होण्याऐवजी तिरंगी, चौरंगी लढती होत आहेत. बºयाच ठिकाणी कार्यकर्ता आपला, मात्र पक्ष बदललेला अशा लढती देखील होत आहेत.
सध्याचे राजकीय चित्र पहाता निकालानंतर सत्तेसाठी भाजप, शिवसेना व काँग्रेसमध्ये मोठी ओढाताण राहणार आहे. यावेळी सर्वच राजकीय समिकरणे देखील बदललेली असतील ही शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे निवडणूकपूर्व आणि निवडणुकीनंतरही खिचडी राजकारण जिल्हा परिषद अनुभवनार असल्याचे सध्याचे चित्र आहे.
नोव्हेंबर १९९८
पहिली निवडणूक । एकतर्फी काँग्रेस
पहिल्या निवडणुकीत काँग्रेसने एक तृतीयांश पेक्षा अधीक बहुमत मिळविले. विरोधी पक्षाचे अस्तित्वच जिल्हा परिषदेत नव्हते. त्यामुळे सत्ताधारी गटातीलच एक गट विरोधी पक्षाची भुमिका पार पाडत होता.
नोव्हेंबर २००३
दुसरी निवडणूक । पुन्हा काँग्रेसच...
दुसºया निवडणुकीत काँग्रेसच्या विरोधात राष्टÑवादी, माकप, अपक्ष असे काही सदस्य निवडून आले. त्यामुळे सभागृहात बºयापैकी विकास कामांवर चर्चा होऊ लागल्या, निर्णय होऊ लागले.
नोव्हेंबर २००८
तिसरी निवडणूक । राष्टÑवादीची सत्ता
तिसºया निवडणुकीत राष्टÑवादीने स्पष्ट बहुमत मिळवून सत्ता स्थापन केली. परंतु प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस समोर होता. त्यामुळे पाच वर्षात दोन्ही पक्षांची जुगलबंदी जिल्हा परिषदेत दिसून आली.
नोव्हेंबर २०१४
चौथी निवडणूक । अटीतटीत काँग्रेसच
अतिशय अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा निसटता पराभव होऊन काँग्रेसला सत्ता हस्तगत करता आली. काँग्रेसला २९ जागा, राष्टÑवादीला २५ व भाजपला एक जागा मिळून अतितटीत काँग्रेसने सत्ता सांभाळली.
जानेवारी २०२०
पाचवी निवडणूक । सर्व पक्ष मैदानात
सध्याची पाचवी निवडणूक ही वर्षभरापूर्वीच अर्थात नोव्हेंबर २०१८ मध्येच होणे अपेक्षीत होते. परंतु न्यायालीन बाबींमुळे निवडणूक पुढे ढकलली गेली. यावेळी सर्वच प्रमुख राजकीय पक्ष मैदानात आहेत.