जि.प. सभापतींच्या राजिनाम्यासाठी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 12:28 PM2017-08-17T12:28:43+5:302017-08-17T12:28:43+5:30
विद्यार्थी खून प्रकरण : जिल्हा परिषद अध्यक्षांना महिलांनी दिले निवेदन
ऑनलाईन लोकमत
दिनांक 17 ऑगस्ट
नंदुरबार : येथील शालेय विद्यार्थी राज ठाकरे याचा खून करणा:या बालकाचे पालक असलेले जिल्हा परिषद बांधकाम व अर्थ समिती सभापती दत्तू चौरे यांनी राजिनामा द्यावा या मागणीसाठी महिलांनी बुधवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून जिल्हा परिषद अध्यक्षांना निवेदन दिले.
दुपारी 12 वाजता नवापूर चौफुलीवर मोर्चा सुरू झाला. यावेळी महिलांनी विविध निषेधाचे फलक हाती घेतले होते. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर महिलांना अडविण्यात आले. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हा परिषद अध्यक्षांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, राज ठाकरे या निरागस बालकाचा त्याच्याच दोन अल्पवयीन मित्रांनी खून केला. संशयीतांना जामीन फेटाळला गेल्यानंतर लागलीच त्यांना त्यांच्या पालकांनी रिमांड होममध्ये पाठविणे आवश्यक असतांना त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी त्यांच्यावरही गुन्हा दाखल आहे. असे असतांना एका जबाबदार पदावर दत्तू चौरे कसे राहू शकतात असा प्रश्न निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. या गुन्ह्यात मुलांच्या पालकांना देखील सहआरोपी करावे अशी मागणीही करण्यात आली. दत्तू चौरे यांच्याकडून राजकीय दबाव आणून तपास कामात हस्तक्षेप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.