नववी,अकरावीचे १ लाख ७९ हजार विद्यार्थी विनापरीक्षा पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:13 AM2021-04-12T04:13:20+5:302021-04-12T04:13:20+5:30
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतल्यानंतर राज्यभरातील विविध माध्यमिक ...
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतल्यानंतर राज्यभरातील विविध माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनांनी केलेली मागणी व कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन शिक्षण विभागाने नववी व अकरावीच्या परीक्षाही रद्द केल्या आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील नववीच्या १ लाख ११ हजार ४२१ व अकरावीच्या ६८ हजार १६० विद्यार्थ्यांसह सुमारे १ लाख ७९ हजार ५८७ विद्यार्थी विनापरीक्षा पास झाले आहेत. यात ९५ हजार ४३१ मुले तर ९० हजार १५० मुलींचा समावेश आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या पहिली ते आठवीच्या परीक्षा यापूर्वीच रद्द करण्यात आल्या. पहिली ते आठवीचे सुमारे ९ लाख ६० लाख ५७४ विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे. त्याप्रमाणे आता नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही विनापरीक्षा पास करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाच पावल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
इन्फो-
विद्यार्थी खूश, पालक चिंतेत
शिक्षक संघटनांकडून होणारी मागणी आणि कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी खूश झाले असले तरी पालकांच्या चिंतेत मात्र भर पडली आहे. कोरोनामुळे मागच्या वर्षीही विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या, आता सलग दुसऱ्या वर्षी हीच परिस्थिती ओढवल्याने पालक चिंतेत असून कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण होऊ शकते तर ऑनलाईन परीक्षा का नाही, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
कोट-
ऑनलाईन शिक्षणातून विद्यार्थ्यांनी काय ज्ञानार्जन केले आहे, हे तपासण्यासाठी ऑनलाईन परीक्षेचा पर्याय आहे, परंतु शिक्षण विभागाने याविषयी कोणताही विचार न करता परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात काही गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केलेला नसल्याने शाळांंमध्ये प्रत्यक्ष वर्ग सुरू होते. अशा शाळांमध्ये योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करून परीक्षा घेणे आवश्यक आहे, परंतु सलग दुसऱ्या वर्षातही परीक्षा होणार नसतील तर विद्यार्थ्यांना परीक्षांचे गांभीर्यच उरणार नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने पुनर्विचार करून ऑनलाईन परीक्षेचा विचार करणे आवश्यक आहे.
- समाधान गायकर, पालक
पॉईंटर
नववी- १,११,४२१
मुले -५९८२४
मुली-५१५९७
--
अकरावी- ६८१६०
मुले -३५६०७
मुली -३२५५३
एकूण १ लाख ७९ हजार ५८७