तब्बल ८ लाख मे. टन द्राक्षमाल पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 12:01 AM2020-04-04T00:01:56+5:302020-04-04T00:02:10+5:30
कोरोनामुळे संपूर्ण भारतात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला लॉकडाउन आणि निसर्गाने दिलेला दगा यामुळे राज्यात हंगामात तयार झालेला तब्बल ८ लाख मेट्रिक टन द्राक्षांचा साठा पडून आहे. त्यामुळे उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे.
नाशिक : कोरोनामुळे संपूर्ण भारतात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला लॉकडाउन आणि निसर्गाने दिलेला दगा यामुळे राज्यात हंगामात तयार झालेला तब्बल ८ लाख मेट्रिक टन द्राक्षांचा साठा पडून आहे. त्यामुळे उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे.
द्राक्ष हंगाम बहरात असताना कोरोनाचे संकट उभे राहिले आहे. सर्वत्र लॉकडाउन झाल्याने द्राक्ष निर्यात बंद झाली. याबाबत सातत्याने झालेली ओरड आणि बळीराजाचे होणारे नुकसान पाहता संचारबंदीच्या काळात शेतमाल वाहतुकीसाठी शासनाने परवानगी दिली असली तरी परराज्यात अनेक अडचणी उभ्या ठाकत असल्याने उत्पादकांवरील संकट कायम आहे. सद्य:स्थितीत उत्पादक वाराणसी, कोलकाता यासारख्या शहरात द्राक्ष निर्यातीचा प्रयत्न करत असले तरी, ‘पॅकिंग’साठी संबंधित ठिकाणी मजूरच मिळत नाही, तर अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनीही
पाठ फिरवल्याने माल पडून आहे. काही व्यापारी उत्साह दाखवित
असले तरी या ठिकाणी पोहोचेपर्यंतचा खर्च वसूल होणे जिकिरीचे आहे. शिवाय के्रटमध्ये असाच माल पडून राहिल्यास द्राक्षांचे मणी गळून पडण्याची भीती उत्पादकांनी व्यक्त केली आहे.
निर्यातीचा हंगाम २० एप्रिलपर्यंत चालतो. या काळात राज्यभरातून सुमारे २००० कंटेनर इतका माल ठिकठिकाणी गेला असता, मात्र हंगामातच कोरोनाचे संकट उभे ठाकल्यामुळे आर्थिक नुकसान भरून काढणार कसे? असा प्रश्न उत्पादकांपुढे कायम आहे. त्यासाठी शासनानेच आता बळीराजाला न्याय देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
निसर्गानेही मारले...
कोरोनाचे सावट कायम असताना राज्याच्या अनेक भागात गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार वादळाच्या तडाख्यासह अवकाळी पावसाने द्राक्षबागा भुईसपाट झाल्या. शेतकऱ्यांचे लाखो रुपये डोळ्यांदेखत पाण्यात गेले. या दुहेरी संकटाचा सामना कसा करायचा, असा प्रश्न द्राक्ष उत्पादकांपुढे निर्माण झाला आहे.
गावोगावी विक्रीची परवानगी द्या...
शेतमाल वाहतुकीस शासनाने परवानगी दिली असली तरी निर्यातीचे संकट कायम आहे. संचारबंदीच्या काळात शासनाने द्राक्ष उत्पादकांना विशेष पास देऊन गावोगावी द्राक्ष विकता येतील अशी व्यवस्था करावी. त्यामुळे काहीसे नुकसान टाळता येईल, अशी मागणी निर्यातदार मधुकर ढोमसे यांनी केली आहे.
कोरोना आणि निसर्गाच्या फटक्याने ‘मार्च एण्ड’नंतर बळीराजाचाच ‘एण्ड’ होतो का? अशी भीती निर्माण झाली आहे. शासनाने आता महत्त्वाचा घटक समजल्या जाणाºया बळीराजाला हजारात मदत न करता लाखात मदत करून उभारी देणे अंत्यत महत्त्वाचे आहे.
-जगन्नाथ खापरे, अध्यक्ष, राज्य बागायतदार संघटना