नाशिकमध्ये १ हजार ५८० मेगावॅट विजेची होणार निर्मिती
By संदीप भालेराव | Updated: August 19, 2023 15:42 IST2023-08-19T15:41:51+5:302023-08-19T15:42:10+5:30
शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२.०’ या महत्त्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून राज्यासह नाशिक जिल्ह्यात कृषी फिडर सौर उर्जित करून सौर कृषी वाहिनी माध्यमातून कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा होणार आहे.

नाशिकमध्ये १ हजार ५८० मेगावॅट विजेची होणार निर्मिती
नाशिक : जिल्ह्यात १८८ विद्युत उपकेंद्रे सौर उर्जाकरण होणार असून यामधून ७ हजार ९०० एकर जमिनीवर सौर प्रकल्प उभारण्यात येऊन १ हजार ५८० मेगावॅट वीजनिर्मिती केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ६९ उपकेंद्राच्या नजीक २ हजार ३६५ एकर तसेच क्लस्टर्सच्या व्यतिरिक्त १७ विद्युत उपकेंद्रांसाठी ६७६ एकर अशी एकूण ३ हजार ४१ एकर शासकीय जागा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध देखील झाली आहे. यामुळे आता कृषिपंपांना दिवसा देखील वीजपुरवठा होऊ शकणार आहे.
शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२.०’ या महत्त्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून राज्यासह नाशिक जिल्ह्यात कृषी फिडर सौर उर्जित करून सौर कृषी वाहिनी माध्यमातून कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा होणार आहे. या योजनेच्या पूर्ततेसाठी आवश्यक जमीन तातडीने उपलब्ध व्हावी याकरिता प्रत्येक जिल्ह्यासाठी समिती गठीत करण्यात आली होती. त्यानुसार नााशिक जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात नाशिक ०१, ०२ आणि ०३ अशा तीन क्लस्टर्सची निवड करण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात ८४ विद्युत उपकेंद्रे सौर उर्जिकरण होणार असून यासाठी एकूण ३ हजार ३४० एकर जमिनीची गरज लागणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ३५ विद्युत उपकेंद्रांसाठी अशी एकूण १ हजार ५७२ एकर जमिनीची उपलब्धता करून देण्यात आली तर ३४ विद्युत उपकेंद्रांसाठी अंशत: ७९३ एकर जमीन उपलब्ध झाली आहे.