कळवणच्या रुग्णालयाला दोन व्हेंटिलेटरसह १० कॉन्सेंट्रेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:14 AM2021-07-30T04:14:59+5:302021-07-30T04:14:59+5:30
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता, प्रशासन सर्व स्तरावर तयारी करीत आहे. कळवण तालुक्यातही सर्व उपाययोजना असाव्यात या हेतूने ...
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता, प्रशासन सर्व स्तरावर तयारी करीत आहे.
कळवण तालुक्यातही सर्व उपाययोजना असाव्यात या हेतूने सहायक जिल्हाधिकारी विकास मीना हे राज्यस्तरीय कोरोना नियंत्रण कक्षाशी सतत समन्वय साधून प्रयत्न करीत आहेत.
तालुका प्रशासनाच्या उत्तम समन्वयाने या आधीही कळवणला दोन हजार पीपीई किट्स व कोविड रुग्णांच्या निरीक्षणसाठी अत्याधुनिक नावीन्यपूर्ण प्रणाली कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध झाली आहे. त्यानंतर राज्याच्या कोविड नियंत्रण कक्षातील कळवणचे भूमिपुत्र अमित कोठावदे यांच्या माध्यमातून आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री फाउंडेशन, ॲक्सेंचर फाउंडेशनच्या सामाजिक दायित्व निधीतून व्हेंटिलेटर व कॉन्सेंट्रेटर भेट देण्यात आले.
तालुका आरोग्य यंत्रणा सक्षम झाल्यास रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही, अशी भावना अमित कोठावदे यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक वैभव काकुळते यांनी केले. याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनंत पवार यांनी या अत्याधुनिक साधन सामग्रीचा आगामी संभाव्य तिसऱ्या लाटेत रुग्णसेवा देण्याकामी सुयोग्य पद्धतीने वापर केला जाईल , असे सांगितले.
याप्रसंगी तहसीलदार बी. ए. कापसे, कळवण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनंत पवार, जलतज्ज्ञ डॉ. किशोर कुवर तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
290721\29nsk_29_29072021_13.jpg
कळवण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अनंत पवार यांच्याकडे साधनसामग्री सूपूर्द करताना अमितो कोठावदे.