दहा दिवसांचे बौद्धाचार्य श्रामणेर शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 10:43 PM2019-02-23T22:43:44+5:302019-02-23T23:59:00+5:30
भारतीय बौद्ध महासभा त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीने येथे दहा दिवसांचे बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या नित्यक्रमातील एक भाग म्हणून दररोज प्रभातफेरी काढली जाते.
त्र्यंबकेश्वर : भारतीय बौद्ध महासभा त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीने येथे दहा दिवसांचे बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या नित्यक्रमातील एक भाग म्हणून दररोज प्रभातफेरी काढली जाते.
दररोज काढण्यात येणाऱ्या फेरीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येते. लताबाई ढेंगळे व लता गांगुर्डे, कल्पना सोनवणे, मीना सोनवणे रोज फेरी निघाल्यापासून ते समारोप होईपर्यंत श्रामनेर बौद्धाचार्य यांच्याबरोबर फेरीपुढे फुलांचा सडा टाकत स्वागत करत आहे. प्राची तिवडे, बेबी सोनवणे, माधुरी, समीक्षा सोनवणे या संघाची पूजा करतात. रविवारी (दि.२४) या शिबिराचा समारोप होणार आहे.
येथील अमृतकुंभ अतिथी निवासमधील हॉलमध्ये आयोजित केलेले आतापर्यंतचे हे तिसरे शिबिर असल्याने ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मागील शुक्रवारपासून या श्रामनेर शिबिरास प्रारंभ झाला आहे. शिबिर काळात दररोज भगवान गौतम बुद्ध व त्यांचा धम्म यावर विस्तृत माहिती दिली जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रमाई आंबेडकर त्यांचे जीवनकार्य आदींचीदेखील ओळख करून दिली जाते. शिबिरांर्तगत दररोज सकाळी एक तास विपश्यना केली जाते. त्यानंतर बुद्धवंदना होते.
यानंतर गावातून प्रभात फेरी काढली जाते.
जलदानविधीबाबत मार्गदर्शन
शिबिरात सहभागाी श्रामनेरांना बारसे (नामकरण), वाढदिवस, विवाह वाढदिवस, जलदानविधी आदींबाबत बौद्ध धर्मानुसार विधी शिकविले जातात. तसेच संघाचे आचारविचार कसे असावेत, श्रामणेर बौद्धाचार्यांचे आचारविचार कसे असावेत याबद्दलही माहिती दिली जाते. शिबिरात सुमारे २५ ते ३० विषय शिकविले जातात. भगवान गौतम बुद्धांचे चरित्र, त्यांचे राजकीय जीवन, त्याचे कार्य याविषयी माहिती दिली जाते.