नाशिकमध्ये पोलिसांनी शोधले १० लाखांचे मोबाइल फोन; तक्रारदारांच्या चेहऱ्यावर झळकला आनंद

By अझहर शेख | Published: June 11, 2024 04:29 PM2024-06-11T16:29:20+5:302024-06-11T16:31:27+5:30

काय आहे सीईआयआर प्रणाली?

10 lakh mobile phones found by police in Nashik There was joy on the faces of the complainants | नाशिकमध्ये पोलिसांनी शोधले १० लाखांचे मोबाइल फोन; तक्रारदारांच्या चेहऱ्यावर झळकला आनंद

नाशिकमध्ये पोलिसांनी शोधले १० लाखांचे मोबाइल फोन; तक्रारदारांच्या चेहऱ्यावर झळकला आनंद

अझहर शेख, नाशिक: मुंबईनाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्याठिकाणी गहाळ झालेले किंवा चोरीला गेलेल्या नागरिकांचे ५० महागडे मोबाइल गुन्हे शोध पथकाने सीईआयआर प्रणालीचा वापर करत शोधून नागरिकांना परत केले आहे. सुमारे १० लाख ४० हजार रूपयांचा हा मुद्देमाल मुंबईनाका पोलिसांकडून वाटप करण्यात आला. गहाळ झालेले मोबाइल पुन्हा हाती आल्याचा आनंद यावेळी तक्रारदारांच्या चेहऱ्यावर झळकला.

मोबाइल हरविला किंवा चोरीला गेला तर तो पुन्हा परत मिळेल, याची शाश्वती कोणालाही नसते. कारण अनेकदा चोरीला गेलेले मोबाइल वर्षानुवर्षे पुन्हा मिळत नाही. यामुळे नागरिकसुद्धा तक्रार केल्यानंतर आपला मोबाइल हरविला आहे, हे काही महिन्यांनी विसरून जातात; मात्र पोलिसांनी ठरविले तर ते हरिवलेल्या मोबाइलचाही शोध घेऊ शकतात. मुंबईनाका गुन्हे शोध पथकाने हे दाखवून दिले आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी चोरीला गेलेले व गहाळ झालेल्या मोबाइलचा शोध घेण्याचे आदेश सर्व पोलिस ठाण्यांना दिले आहेत. यानुसार याच प्रणालीचा वापर करत वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक सुधीर पाटील, उपनिरिक्षक निसार शेख, सहायक उपनिरिक्षक रोहिदास सोनार, अंमलदार समीर शेख, गणेश बोरणारे यांच्या पथकाने सुमारे ५० मोबाइलचा शोध घेतला. त्यानंतर पोलिस ठाण्याच्या दप्तरी नोंद असलेल्या तक्रारदारांना बोलावून मोबाइलची खात्री पटवून गिरी यांच्या हस्ते सन्मानपुर्वक ते त्यांना परत करण्यात आले.

काय आहे सीईआयआर प्रणाली?

सेंट्रलाइज इक्विपमेंट आयडेंटी रजिस्टर (सीईआयआर) या शासकिय पोर्टलद्वारे हरविलेल्या मोबाइल फोनचा शोध पोलिसांना घेणे शक्यत होते. या पोर्टलवर नागरिकदेखील त्यांच्या गहाळ झालेल्या किंवा चोरीला गेलेल्या मोबाइलचा तपशील भरू शकता. हा तपशील (आयएमईआय क्रमांक) पुढे टेलिकॉम सेवा पुरवठादारांकडे व सोबतच पोलिस प्रशासनाच्या ट्रॅकिंग यंत्रणेकडे पाठविला जातो. यानंतर पोलिस त्याद्वारे मोबाइलचा शोध घेतात. महाराष्ट्रात २०१९साली ही प्रणाली सरकारकडून कार्यान्वित करण्यात आली आहे.

Web Title: 10 lakh mobile phones found by police in Nashik There was joy on the faces of the complainants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.