मनुष्यहानीला दहा लाख; जनावराची किंमत दहा हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 11:24 PM2018-08-07T23:24:30+5:302018-08-07T23:25:18+5:30
नाशिक : हिंस्र प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्याने मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत चालली असून, त्यातून कुटुंबप्रमुख वा लहान बालके ‘लक्ष्य’ केले जात आहे. अशा परिस्थिती स्वसंरक्षणार्थ वन्यप्राण्यांची शिकार अथवा त्यांना जखमी केल्यास कायद्याचा फास गळ्याभोवती आवळण्याची भीती असल्यामुळे सरकारविषयी व्यक्त होत असलेली नाराजी कमी करण्यासाठी अशा हल्ल्यामुळे होणाºया मनुष्य व जनावरांच्या हानीने होणारे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने मदतीत भरीव वाढ केली आहे.
नाशिक जिल्ह्णात बिबट्यांची वाढलेली संख्या व दर दिवसा त्यांच्याकडून मानवी वस्तीत शिरकाव करून होत असलेल्या हल्ल्याची संख्या पाहता शासन निर्णयाने बळी पडणाºयांना मोठा दिलासा मिळाला आहे. निफाड, इगतपुरी, सिन्नर, बागलाण, मालेगाव, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये बिबट्यांचे प्रमाण वाढले आहे. एकट्या, दुकट्या शेतकºयावर जीवघेणा हल्ला करून, लहान बालकांना पळवून नेणे, जनावरांचा फडशा पाडण्याच्या घटना घडल्या आहेत. या वन्यप्राण्यांना अटकाव करण्याचे वन खात्याचे प्रयत्न तोकडे पडू लागले आहेत. बिबट्यांचे नित्याचेच दर्शन होऊन त्यांना पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची अनुमती नागपूरस्थित वन खात्याकडून दिली जात असल्याने अशी परवानगी मिळण्यासाठी महिन्याचा कालावधी लोटत आहे, परिणामी बिबट्यांशी दोन हात करण्याशिवाय ग्रामस्थांना पर्यायच शिल्लक नसून, हल्ल्याच्या भीतीपोटी नागरिकांनी रात्री-अपरात्री घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीत वन खात्याविषयी व पर्यायाने सरकारबाबत रोष व्यक्त होत असताना शासनाने वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती व रानाकुत्रे यांच्य हल्ल्यात मनुष्यहानी झाल्यास कुटुंबीयांना दहा लाख रुपये मदत देण्याचे जाहीर केले.
हल्ल्यात कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख व गंभीर जखमी झाल्यास सव्वा लाख रुपये वाढीव मदत दिली जाणार आहे. किरकोळ जखमी झाल्यास औषधोपचारासाठी येणारा खर्च शासन अदा करणार असून, त्याची मर्यादा २० हजारांपर्यंत असणार आहे.
हिंस्रप्राण्यांच्या हल्ल्यात गाय, म्हैस व बैल मृत्यू झाल्यास बाजारभावाच्या ७५ टक्केकिंवा ४० हजार रुपये, तर मेंढी, बकरी व इतर पशुधनासाठी दहा हजार रुपये मदत दिली जाईल. अपंगत्व आल्यास बारा हजार रुपये दिले जाणार आहेत. मदतीची काही रक्कम रोख व उर्वरित रक्कम फिक्स डिपॉझिट ठेवण्यात येणार आहे.