अंबरनाथचे १० साईभक्त ठार; खासगी बस- ट्रकची टक्कर, अपघातात ३४ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 06:18 AM2023-01-14T06:18:40+5:302023-01-14T06:18:47+5:30
सिन्नर-शिर्डी मार्गावर अपघात
- शैलेश कर्पे
नाशिक : सिन्नर-शिर्डी महामार्गावर खासगी आराम बस व ट्रक यांच्यात शुक्रवारी पहाटे टक्कर होऊन खासगी बसची एक बाजू कापली गेली. या भीषण अपघातात अंबरनाथ परिसरातील दहा साईभक्तांचा मृत्यू झाला. त्यात सहा महिला, दोन पुरुष व दोन लहान मुलांचा समावेश आहे. अपघातात उल्हासनगर, कल्याण, बदलापूर परिसरातील ३४ जण जखमी झाले. २३ जखमींवर सिन्नरला उपचार सुरु असून उर्वरित जखमींना उपचारानंतर पाठवण्यात आले. अपघातात दोन्ही वाहनचालक किरकोळ जखमी झाले.
अंबरनाथच्या लक्ष्मीनारायण प्रिंटिंग ॲण्ड पॅकेजिंग कंपनीने कामगार व त्यांच्या नातेवाईकांसाठी माेफत शिर्डी दर्शनासाठी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास १२ खासगी बस व अन्य तीन छोटी वाहने नेली होती. वावी गावानंतर एक आराम बस व ट्रक यांची टक्कर झाली. जखमींना सिन्नरच्या यशवंत आणि मातोश्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील २१ जखमी यशवंत रुग्णालयात उपचार घेत असून सहा जण गंभीर जखमी आहेत. तीनजण मातोश्री रुग्णालयात उपचार घेत आहेत.
रक्ताचा सडा आणि काचेचा खच
अपघातानंतर दोन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. खासगी बस उलटल्याने साखरझोपेत असलेल्यांना जोरदार धक्का बसला. खासगी बस कापली जाऊन उलटतानाच दहा जण ठार, तर ३४ जण जखमी झाले. घटनास्थळी रक्ताचा सडा आणि काचेचा खच साचला होता. जखमींचा आक्रोश मन सुन्न करणारा होता.
मृतांच्या नातलगांना पाच लाख रुपयांची मदत
अपघात झाल्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी सिन्नरला धाव घेतली. जखमींना धीर देत सर्व खर्च शासकीय मदतीतून करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनेची माहिती घेतली आहे. मृतांच्या नातलगांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याचे भुसे म्हणाले.
मृतांची नावे : श्रद्धा सुहास बारस्कर (३५), श्रावणी सुहास बारस्कर (९), नरेश मनोहर उबाळे (३८), वैशाली नरेश उबाळे (३२), चांदनी निर्मल गच्छे (१३), बालाजी कृष्ण महंती (२८), अंशुमन बाबू महंती (७), रोशनी राजेश वाडेकर (३६) सर्व राहणार मोरीवली, ता. अंबरनाथ. दीक्षा संतोष गोंधळी (१७) रा. एकवीरा प्लाझा, चिंचपाडा, कल्याण (पू.), प्रमिला प्रकाश गोंधळी (४५) रा. हातीब, ता. संगमेश्वर.