आरोग्यच्या लेखी परीक्षेला १० हजार परीक्षार्थींची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2021 12:46 AM2021-11-01T00:46:29+5:302021-11-01T00:46:50+5:30
महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील गट-क आणि गट-ड संवर्गातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असून रविवारी नाशिक जिल्ह्यातील ६५ केंद्रांवर सुमारे २७ हजार उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली. परंतु, तब्बल १० हजार ६२ उमेदवारांनी या परीक्षेला दांडी मारली तर सुमारे ६२ टक्के म्हणजेच १६ हजार ९४१ परीक्षार्थींनी या भरती प्रक्रियेत सहभाग नोंदवत गट ड संवर्गातील नोकरीसाठी परीक्षा दिली.
नाशिक : महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील गट-क आणि गट-ड संवर्गातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असून रविवारी नाशिक जिल्ह्यातील ६५ केंद्रांवर सुमारे २७ हजार उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली. परंतु, तब्बल १० हजार ६२ उमेदवारांनी या परीक्षेला दांडी मारली तर सुमारे ६२ टक्के म्हणजेच १६ हजार ९४१ परीक्षार्थींनी या भरती प्रक्रियेत सहभाग नोंदवत गट ड संवर्गातील नोकरीसाठी परीक्षा दिली.
आरोग्य विभागातील गट-क संवर्गाची लेखी परीक्षा यापूर्वी राज्याच्या १७ जिल्ह्यांच्या मुख्यालयी २४ ऑक्टोबरला घेण्यात आलेल्या परीक्षेत प्रचंड गोधळ उडाल्यानंतर रविवारी (दि. ३१) गट-ड संवर्गाची लेखी परीक्षा दुपारी २ ते ४ या वेळेत घेण्यात आली. त्यामुळे या परीक्षेकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असताना रविवारी अपवाद वगळता सर्वच केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी दिली आहे. नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यात गट-ड संवर्गासाठी एकूण ५३ हजार ३२६ नोंदणीकृत परीक्षार्थी या परीक्षेला प्रविष्ठ होणार होेते. त्यांच्यासाठी १२९ शाळांमध्ये परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. यात नाशिक जिल्ह्यात एकूण २७ हजार ३ नोंदणीकृत परीक्षार्थींसाठी ६५ केंद्रांवर परीक्षेचे नियोजन केलेले असताना केवळ १६ हजार ९४१ उमेदवारांनी रविवारी प्रत्यक्ष केंद्रावर उपस्थित राहून परीक्षा दिली. तर १० हजार ६१ परीक्षार्थी विविध कारणांनी या परीक्षेसाठी अनुपस्थित राहिल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
विभागात अशी झाली परीक्षा
जिल्हा - नोंदणीकृत - उपस्थित - अनुपस्थित
नाशिक - २७००३ - १६९४१ - १००६२
धुळे - ३०१४ - ७८०३ - १२११
जळगाव - ७९७१ -५९२८ - २०६३
नंदुरबार - ७१२७ - ५२३७ - १८९०
अहमदनगर - ८१९१ -५४५५ - २७३६