१० हजार विद्यार्थी फिरकलेच नाहीत
By admin | Published: July 13, 2017 12:17 AM2017-07-13T00:17:14+5:302017-07-13T00:34:38+5:30
अकरावी प्रवेश : दुसऱ्या दिवसापर्यंत केवळ चार हजार प्रवेश; आज अखेरची संधी
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : इयत्ता अकरावी प्रवेशाची सुमारे १४ हजार विद्यार्थ्यांची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असली तरी अद्यापही १० हजार विद्यार्थी महाविद्यालयाकडे फिरकलेही नाहीत. पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीसाठी महाविद्यालये अलॉट झाले असतानाही दोन दिवसात केवळ ४ हजार ३६२ इतकेच प्रवेश शहरातील महाविद्यालयांमध्ये होऊ शकले आहेत.
अकरावीच्या प्रवेशाला उडणारी झुंबड यंदा आॅनलाइन प्रक्रियेमुळे दिसत नसली तरी प्रवेशासाठी तीन दिवसांचा अवधी देण्यात आल्याने तीन दिवसात पसंतीच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशप्रक्रिया पूर्ण होईल असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे. विज्ञान शाखेच्या ६४५४ जागांसाठी ४३७३ इतक्या विद्यार्थ्यांना महाविद्यालये अलॉट झाली होती; मात्र अद्याप केवळ २०७२ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केले आहेत. वाणिज्य शाखेतही अशीच परिस्थिती असून, २२९१ पैकी केवळ ७७२ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी उत्सुकता दाखविली आहे. कला शाखेतील प्रवेश मात्र तीन दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. दोन दिवसातच ९० टक्क्यांपर्यंत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत; मात्र वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या बाबतीत अजूनही विद्यार्थी पसंतीच्या कॉलेजच्याच प्रतीक्षेत आहेत. पहिल्या पसंतीच्या विद्यार्थ्यांनीदेखील अद्याप प्रवेशाची घाई केलेली नाही. गुरुवारी प्रवेशाचा अखेरचा दिवस असल्याने प्रथम पसंतीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करावाच लागणार आहे. दुसऱ्या पसंतीलाही महत्त्वाचे कॉलेज मिळणे शक्यआपल्या आवडीचे महाविद्यालय पहिल्या पसंतीस न मिळाल्याने हिरमोड झालेल्या विद्यार्थ्यांना कदाचित दुसऱ्या पसंतीचे महाविद्यालय म्हणून त्यांना प्रवेश मिळू शकतो, अशीही शक्यता वर्तविली जात आहे. ज्या मोठ्या आणि महत्त्वाच्या महाविद्यालयांमध्ये गर्दी कमी दिसते, त्यामध्ये यापूर्वीच २५ टक्के इनहाउस आणि मॅनेजमेंट कोट्याचे प्रवेश झाले आहेत. या जागा आणि पहिल्या पसंतीचे प्रवेश होऊन काही जागा विद्यार्थ्यांना मिळू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना त्यांनी भरलेल्या पसंतीक्रम २ ते २० मधील कनिष्ठ महाविद्यालय मिळाले असेल त्यांना दि. १५ तारखेपर्यंत पसंतीक्रम व शाखा बदलून पसंतीक्रम बदलण्याची सुविधा असेल.