अल्पवयीनवर अत्याचार करणाऱ्यास १० वर्षे सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2022 12:14 AM2022-01-19T00:14:49+5:302022-01-19T00:14:49+5:30
मालेगाव : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून व लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी आरोपी नाना उर्फ लहानू बाबूलाल माळी (४४) यास अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायाधीश एस. सी. मगरे यांनी दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

छोटू सखाराम मोरे यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली होती. १६ मे २०१७ रोजी ही घटना घडली होती. आरोपी नाना उर्फ लहानू माळी याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले होते. तालुक्यातील मौजे टिंगरी येथील प्रमोद देशपांडे यांच्या मळ्यात व जळगाव जिल्ह्यातील देवगाव देवडी शिवार ता. अमळनेर तसेच खेडील ढेकू ता. पारोळा येथील सरपंच भगवान राजपूत यांच्या मळ्यात अशा वेगवेगळ्या ठिकाणी १६ मे २०१७ ते ७ जून २०१७ दरम्यान तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.
आरोपी हा नात्याने फिर्यादीचा चुलत साला असून, ते टिंगरी गावातील प्रमोद देशपांडे यांच्या मळ्यात मजुरांना राहण्यासाठी दिलेल्या खोल्यांमध्ये शेजारी - शेजारी राहत होते. अतिरिक्त सहायक सरकारी वकील एस. के. सोनवणे यांनी सरकार पक्षातर्फे ५ साक्षीदार तपासले. सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करून गुन्हा सिद्ध केला. तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांनी तपास केला. पैरवी अधिकारी हवालदार विजय लवांड यांनी मदत केली. आरोपीस ८ वर्षे कारावास, ५ हजार रुपये दंड व १० वर्षे सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली.