जिल्हा रुग्णालयात बालकांसाठी १०० खाटांचे रुग्णालय !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:12 AM2021-05-29T04:12:43+5:302021-05-29T04:12:43+5:30
नाशिक : तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सज्जतेसाठी जिल्हा रुग्णालयात बालकांसाठी स्वतंत्र १०० खाटांच्या स्वतंत्र कक्ष उभारणीला वेग देण्यात आला आहे. ...
नाशिक : तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सज्जतेसाठी जिल्हा रुग्णालयात बालकांसाठी स्वतंत्र १०० खाटांच्या स्वतंत्र कक्ष उभारणीला वेग देण्यात आला आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य इमारतीतच तिसऱ्या मजल्यावर या १०० खाटांच्या कक्षाची स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. या कक्षात भिंतींवर आकर्षक कार्टुन आणि बालकांची चित्रे काढून कक्ष सजविण्यात आला आहे. तसेच बेड आणि ऑक्सिजन लाईनची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. आठवडाभरात या कक्षात आवश्यक असणाऱ्या व्हेंटिलेटर्ससह अन्य मशिनरीजची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यानंतर हा कक्ष जिल्ह्यातील संभावित तिसऱ्या लाटेसाठी सज्ज करण्यात येणार आहे. तिसऱ्या लाटेत दहा वर्षांवरील मुले अधिक प्रमाणात बाधित होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ही सज्जता करण्यात येत आहे. त्याशिवाय महानगर पालिकेच्या वतीनेदेखील शहरात १०० खाटांची दोन रुग्णालये केवळ बालके आणि त्यांच्या मातांसाठी सज्ज करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील तीन ग्रामीण रुग्णालयांमध्ये ५० आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये बालकांसाठी स्वतंत्र २५ खाटांचे नियोजनदेखील करण्यात आले आहे. त्या सर्व बेडची पूर्तता आणि तिथेदेखील ऑक्सिजनलाईनची सज्जता ठेवण्यात येणार आहे. दुसऱ्या लाटेवेळी झालेली ऑक्सिजन अपूर्ततेची उणीव निदान तिसऱ्या लाटेत जाणवणार नाही, या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे.
इन्फो
शहरात खासगीमध्ये ६०० बेड
शहरातील खासगी स्वरुपाच्या ४१ बाल रुग्णालयांमध्ये एकूण ६००हून अधिक बेडची पूर्तता ठेवण्यात आली आहे. त्यात ४०० हून अधिक ऑक्सिजन बेड, २५ व्हेंटिलेटर बेड आणि अन्य बेडची उपलब्धता ठेवण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये मिळून आवश्यकता भासल्यास केवळ बालकांसाठी किमान एक हजारहून अधिक बेड उपलब्ध होणार आहेत.
फोटो (२८पीएच६७)
जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीत बालकांसाठी उभारण्यात आलेला बाल रुग्णांसाठीचा आकर्षक सजावट केलेला कक्ष. छाया
प्रशांत खरोटे