स्मार्ट पर्यटनासाठी  शंभर कोटींचा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:07 AM2018-06-16T00:07:42+5:302018-06-16T00:07:42+5:30

शहरात पोषक असलेल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र शासनाच्या मदतीने खास प्रयत्न करण्यात येत असून, त्याअंतर्गत स्मार्ट पर्यटनाचा आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आराखड्यासाठी नाशिक महापालिका स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने पुढाकार घेतला असून, शुक्रवारी स्मार्ट सिटीच्या बैठकीत त्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली.

100 crore plan for smart tourism | स्मार्ट पर्यटनासाठी  शंभर कोटींचा आराखडा

स्मार्ट पर्यटनासाठी  शंभर कोटींचा आराखडा

Next

नाशिक : शहरात पोषक असलेल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र शासनाच्या मदतीने खास प्रयत्न करण्यात येत असून, त्याअंतर्गत स्मार्ट पर्यटनाचा आराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आराखड्यासाठी नाशिक महापालिका स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने पुढाकार घेतला असून, शुक्रवारी स्मार्ट सिटीच्या बैठकीत त्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली. पर्यटन विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम यांच्या उपस्थितीत यासंदर्भातील बैठक झाली. हा आराखडा सुमारे शंभर कोटी किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा असणार आहे. तो यशस्वी झाल्यास नाशिकच्या धार्मिक-ऐतिहासिक स्थळांचे रूपडेच पालटणार आहे.  महापालिकेत झालेल्या या बैठकीस मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, पर्यटन विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक राठोड, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल, पर्यटन विभागाचे अधिकारी नितीन मुंडावरे, तसेच पुरातत्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. केंद्र शासनाने रामायण सर्किट अंतर्गत दंडकारण्यात आलेल्या नाशिक शहराची निवड केली आहे. नाशिकमध्ये काळाराम मंदिर, सीतागुंफा, सीताहरण व लक्ष्मणरेषा मंदिर, रामकुंड, तपोवन, रामसृष्टी, रामगयातीर्थ, पंचरत्नेश्वर, सीता सरोवर, रामशेज किल्ला, अंजनेरी, सर्वतीर्थ टाकेद अशी प्रभू रामचंद्रांच्या पाऊलखुणा असलेली अनेक ठिकाणे आहेत. रामायण सर्किटच्या माध्यमातून या पर्यटनक्षेत्रांच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यावर भर देण्यात आला. यावेळी पर्यटन विभागाने तयार केलेल्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. त्यानुसार नाशिकमधील धार्मिक, ऐतिहासिक व अन्य पर्यटन स्थळांचे जतन, संवर्धन आणि काही ठिकाणी नूतनीकरण करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. स्मार्ट सिटी व पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक होणार असून, त्यात आराखड्याचे प्रारूप तयार केल्यानंतर स्मार्ट सिटीच्या बैठकीत मंजुरी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यटन स्थळांची माहिती संकलित करणार
या आराखड्याअंतर्गत पर्यटन स्थळांमध्ये अनेक प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करताना एकात्मिक स्वरूपात नाशिकच्या सर्व पर्यटन स्थळांची माहिती संकलित करून ती उपलब्ध करून देणे, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मार्केटिंग करणे आणि त्यासाठी अ‍ॅप, मनपाची पर्यटन स्थळे यांचा वापर करणे, पर्यटनाच्या ठिकाणांबाबत माहिती व दिशादर्शक फलक लावणे, लोकसहभागातून पर्यटकांसाठी निवास व न्याहारीची व्यवस्था करणे याबरोबरच टूर आॅपरेटर आणि गाइड यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. निवास आणि न्याहारीच्या व्यवस्थेबाबत तसेच आदरातिथ्याबाबत खास मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Web Title: 100 crore plan for smart tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :tourismपर्यटन