एकाच दिवसात १०० कोटींचे ‘घबाड’

By admin | Published: November 12, 2016 12:20 AM2016-11-12T00:20:08+5:302016-11-12T00:40:47+5:30

जिल्हा बॅँकेला आले अच्छे दिन

100 crores 'scandal' in one day | एकाच दिवसात १०० कोटींचे ‘घबाड’

एकाच दिवसात १०० कोटींचे ‘घबाड’

Next

नाशिक : चलनातून ५०० आणि १००० हजारच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेसाठी फायद्याचा ठरला असून, गुरुवारी सभासदांनी एकाच दिवसात ७९ कोटी बचत खात्यात, तर १२ कोटी पीक कर्ज खात्यात भरल्याची माहिती सूत्रांनी दिली.
याबाबत गुरुवारीच (दि. १०) ‘लोकमत’ने यासंदर्भात ‘जिल्हा बॅँकेला येणार अच्छे दिन’ मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. बरोबर त्यानुसारच जिल्हा बॅँकेच्या पीक कर्जाची थकलेली वसुली आपोआप जमा होण्यास सुरुवात झाली असून, जिल्हा बॅँकेच्या गंगाजळीतही वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने मागील वर्षी वाटप केलेल्या एकूण पीक कर्जापैकी सुमारे ९०० कोटींची पीक कर्ज थकबाकी सभासद शेतकऱ्यांकडे बाकी आहे. त्यातच यंदाच्या चालू वर्षात सुमारे १७५० कोटींचे पीक कर्ज बॅँकेने वाटप केले आहे; मात्र मागील वर्षीच्या सक्तीच्या वसुलीला राज्य सरकारने चाप लावल्याने जिल्हा बॅँकेचे कोट्यवधी रुपयांचे वाटप केलेले कर्ज थकीत झाले होते. त्यातच मध्यंतरी सहकार खात्याने जिल्हा बॅँकेला पीक कर्जाचे पुनर्गठण करण्यासाठी सक्ती केली. त्यानंतर जिल्हा बॅँकेने सुमारे ३८ ते ४० कोटींचे पीक कर्जाचे पुनर्गठण केले; मात्र सरकारकडून आणि राज्य शिखर बॅँकेकडून अनुदान येत नसल्याने पीक कर्ज वाटपासाठी निधी शिल्लक नव्हता. गुरुवारी एकाच दिवसात बचतखात्यात ७९ कोटी तर पीक कर्ज खात्यात १२ कोटी तसेच अन्य किरकोळ जमा धरून जिल्हा बॅँकेत ९२ कोटी जमा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. सभासद शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना पॅनकार्डची सक्ती नसल्याने त्यांच्याकडील लाखो रुपयांची रक्कम एकरकमी जिल्हा बॅँकेच्या शाखांमध्ये ३० डिसेंबरपर्यंत कधीही भरता येणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत आणखी कोट्यवधींची कर्जवसुली आणि बचतखात्यात निधी जमा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 100 crores 'scandal' in one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.