फुंडकरांनी नाशिकमध्येच दिला होता शत-प्रतिशतचा नारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 01:51 AM2018-06-01T01:51:33+5:302018-06-01T01:51:33+5:30
नाशिक : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान कृषिमंत्री प्रदेशाध्यक्ष असताना पांडूरंग फुंडकर यांनी नाशिकमध्ये सर्वप्रथम शत-प्रतिशत भाजपाची घोषणा दिली होती
नाशिक : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान कृषिमंत्री प्रदेशाध्यक्ष असताना पांडूरंग फुंडकर यांनी नाशिकमध्ये सर्वप्रथम शत-प्रतिशत भाजपाची घोषणा दिली होती आणि ती प्रचंड चर्चेतही ठरली होती. फुंडकर यांच्या निधनानंतर या घडामोडीला उजाळा मिळाला.
जनसंघापासून भाजपा असा प्रवास केलेल्या पांडुरंग फुंडकर यांच्याकडे उदयोन्मुख नेतृत्व म्हणूनच भाजपाने त्यांना वयाच्या तिसाव्या वर्षी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद दिले होते. १९७८ ते ८० हा तो काळ होता. त्यामुळे युवकांना संघटित करण्यासाठी त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या कार्यामुळे आणि संघटन कौशल्यामुळे यशाची कमान कायम राहिली आणि त्यांना पक्षाच्या वतीने विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या. पक्षाचे सरचिटणीस म्हणून काम बघणाºया फुंडकर यांनी राज्यात युतीची सत्ता आली त्यावेळी फारशी संधी मिळाली नव्हती कारण त्यावेळी ते खासदार होते. त्यानंतर २००० मध्ये त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाली. यावेळी नाशिकमधील महाकवी कालिदास कलामंदिरात पक्षाचे अधिवेशन घेण्यात आले.
भाजपाचे राष्टÑीय अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत झालेल्या या अधिवेशनाच्या वेळी फुंडकर यांनी शत-प्रतिशत भाजपाची घोषणा केली होती. ही घोषणा अत्यंत गाजली होती. राज्यात सेना-भाजपा युतीची सत्ता होती आणि सत्ता गेल्यानंतर अशाप्रकारची घोषणा झाल्यानंतर या घोेषणेने शिवसेनेचे नेते अस्वस्थ झाले होते. भाजपा स्वबळावर निवडणूक लढविणार काय? असा प्रश्न सातत्याने केला गेला. अर्थात, शत-प्रतिशत म्हणजे केवळ राजकीय अर्थ घेतला गेला, सर्व क्षेत्रांत भाजपाचा विस्तार करण्यासाठीच ही घोेषणा होती, असे पक्षाचे विद्यमान प्रदेश चिटणीस फुंडकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.