जिल्हा दूध संघासाठी शंभर टक्के मतदान
By admin | Published: June 29, 2015 12:45 AM2015-06-29T00:45:41+5:302015-06-29T00:45:57+5:30
जिल्हा दूध संघासाठी शंभर टक्के मतदान
नाशिक : संपूर्ण जिल्'ाचे लक्ष लागून असलेल्या जिल्हा दूध उत्पादक संघाच्या बारा संचालकपदासाठी रविवारी (दि़२८) मतदान झाले़ १७७ मतदारांपैकी १७६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, मालेगाव तालुक्यातील एका मतदाराचा मृत्यू झालेला असल्याने एक मतदान कमी झाले़ नाशिक-पुणे रोडवरील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात सोमवारी (दि़२९) सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीस सुरुवात होऊन बारा वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे़ दरम्यान, दोन्ही पॅनलच्या नेत्यांनी विजयाचा दावा केला आहे़ मराठा विद्या प्रसारक समाजाच्या गंगापूररोडवरील मराठा हायस्कूलमधील मतदार केंद्रामध्ये सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान झाले़ जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत यंदा प्रथमच माजी आमदार माणिकराव कोकाटे सहभागी झाले असून, किशोर दराडे, संभाजी पवार, राजेंद्र भोसले यांच्या नेतृत्वाखाली ‘शेतकरी विकास पॅनल’, तर माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांच्या नेतृत्वाखाली ‘प्रगती पॅनल’ची निर्मिती करण्यात आली होती़ दूध उत्पादक संघामध्ये संचालक मंडळाच्या एकूण पंधरा जागा असून, त्यापैकी तिघे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत़ उर्वरित १२ जागांसाठी २९ उमेदवार रिंगणात आहेत़ बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये सर्वसाधारण गटातून कळवणचे योगेश पवार, मालेगावचे विनोद चव्हाण, तर अनुसूचित जाती या राखीव गटातून शिवाजी बोराडे यांचा समावेश आहे़ निवडणूक निर्णय अधिकारी जे़ एम़ पगार यांच्या मार्गदर्शनाखाली चार केंद्राध्यक्ष, २० मतदान अधिकारी, चार मतदान कर्मचारी, तीन नियंत्रण कक्ष कर्मचारी, असे एकूण ३२ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली़ दरम्यान, नाशिक - पुणे रोडवरील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होणार असून, यासाठी तीन टेबल व सुमार २२ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)