निफाड तालुक्यात १० हजार शेतकऱ्यांनी केली ई-पीक नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:19 AM2021-09-10T04:19:59+5:302021-09-10T04:19:59+5:30
‘माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीक पेरा’ या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांना स्वतःचा पेरा स्वतःच्या मोबाइलमधून भरता यावा, ...
‘माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीक पेरा’ या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांना स्वतःचा पेरा स्वतःच्या मोबाइलमधून भरता यावा, यासाठी राज्य शासनाने १५ ऑगस्ट २०२१ पासून ई-पीक पाहणी प्रकल्प सुरू केला आहे. निफाड तालुक्याचे तहसीलदार शरद घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल यांनी यासाठी नियोजन केले आहे. याच्या अंमलबजावणीसाठी कृषी विभागही मदत करीत आहे.
आजपर्यंत तालुक्यातील १० हजार शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ॲपद्वारे नोंदणी केली आहे. या ॲपच्या प्रत्यक्ष वापरात शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक शेतकऱ्यांना मोबाइल वापराचेही पुरेसे ज्ञान नसल्याने त्याही अडचणी आहेत. यासाठी प्रशासन गावपातळीवर जाऊन याबाबत जनजागृती करीत आहे.
चौकट...
गणेश मंडळांना आवाहन
गणेश मंडळांना ई-पीक पाहणी ॲपमध्ये शेतकऱ्यांना जोडण्यासाठी आवाहन केले आहे, तसेच मंडळ सदस्यांनी स्वतःचे शेती क्षेत्र तसेच आपल्या मळ्यातील इतर शेतकरी बांधवांची ॲपवर नोंदणी करण्यासाठी जनजागृती व प्रशासनाला सहकार्य करावे, असे निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे यांनी सांगितले.
कोट...
ई-पीक पाहणीसाठी तलाठी प्रत्यक्ष शेतात येऊन मार्गदर्शन करतात. त्यामुळे शेतकरी वर्गाला चांगली मदत होते.
- विजय खेलुकर, शेतकरी, चांदोरी.