१०२ कोरोना वॉरियर्सने केला कोरोनाचा पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 10:24 PM2020-05-20T22:24:51+5:302020-05-20T23:59:56+5:30
नाशिक : महत्त्वाकांक्षा अन् दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनाशी लढा देत खाकी वर्दीतील १०२ योध्द्यांनी कोरोनाचा पराभव केला. १५० पैकी आता केवळ ४८ पोलीस उपचारार्थ रुग्णालयात दाखल आहेत. उर्वरित १०२ पोलीस कोरोनामुक्त झाल्याने आता पोलीस दलाचा आत्मविश्वास अधिकच बळकट झाला आहे.
नाशिक : महत्त्वाकांक्षा अन् दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनाशी लढा देत खाकी वर्दीतील १०२ योध्द्यांनी कोरोनाचा पराभव केला. १५० पैकी आता केवळ ४८ पोलीस उपचारार्थ रुग्णालयात दाखल आहेत. उर्वरित १०२ पोलीस कोरोनामुक्त झाल्याने आता पोलीस दलाचा आत्मविश्वास अधिकच बळकट झाला आहे. लवकरच सर्व पोलीस कोरोनामुक्त होतील अन् ‘खाकी’चा कोरोना युद्धात विजय होईल, असा आशावाद ग्रामीण पोलीस दलाच्या प्रमुख अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी व्यक्त केला आहे.
मालेगाव कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. जिल्ह्यातील निम्मे पोलीस दल तेथे कर्तव्यावर हजर आहे. जनतेला कोरोनापासून सुरक्षित ठेवताना हळूहळू पोलिसांनाही कोरोनाचा विळखा बसू लागला अन् कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा १५० इतका झाला. दरम्यान, एका पोलिसाला आपल्या प्राणाची आहुतीदेखील द्यावी लागली. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ८५५ झाला आहे. त्यामध्ये मालेगावात ६६५ रुग्ण आहेत. यामध्ये पोलीसही मोठ्या प्रमाणात बाधित झाले होते. मालेगावात कोरोनाचा वेग नियंत्रणात यावा यासाठी डोळ्यांत तेल घालून अहोरात्र पोलीस येथील रस्त्यांवर पहारा देत नागरिकांची समजूत काढत त्यांना घरातच थांबण्यासाठी प्रयत्नशील आहेत. २२ मार्च रोजी लॉकडाउन देशभरात सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यातील गावे सांभाळतानात मालेगाव येथे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यानंतर मालेगाव येथे पोलीस बळ वाढवण्यात आले. सध्या मालेगाव येथे १ हजार ४०० पेक्षा अधीक पोलीस अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत.
मालेगावात कार्यरत पोलिसांची तेथील मंगल कार्यालये ताब्यात घेऊन निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना गटागटाने या ठिकाणी राहावे लागत आहे. परंतु काळजी घेऊनही आणि परस्परांमध्ये ‘अंतर’ सुरक्षित ठेवूनसुद्धा कोरोनाने पोलिसांनीही गाठले. मालेगावात एसआरपीएफच्या सहा कंपन्या तैनात आहेत.
-----------------------------
उपचाराअंती सोडले घरी
पॉझिटिव्ह आलेले तसेच त्यांच्या सान्निध्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येत आहे. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या सर्वांना पूर्ण उपचाराअंती घरी सोडण्यात आले. आतापर्यंत यातील १०२ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. मालेगाव येथे कर्तव्य बजावताना कोरोनाची लागण झालेल्या बहुतांश पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.