मेट्रो, स्मार्ट सिटीला ठेंगा, परिवहनसाठी १०२ कोटी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:26 AM2021-02-18T04:26:55+5:302021-02-18T04:26:55+5:30
महापालिकेने बससेवेच्या तयारीसाठी भरीव तरतूद केली असली तरी नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीसाठी मात्र कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. ...
महापालिकेने बससेवेच्या तयारीसाठी भरीव तरतूद केली असली तरी नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीसाठी मात्र कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. या कंपनीकडे महापालिकेचे अगोदरच शंभर कोटी रुपये पडून आहेत. त्यामुळे त्यासाठी यंदा कोणतीही तरतूद केलेली नाही असे आयुक्तांनी स्पष्ट केले. केंद्र शासनाने नाशिक शहरासाठी निओ मेट्रो सुरू करण्यासाठी २ हजार ९२ कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यात राज्य शासनाचा वाटा सुमारे पाचशे कोटी रुपये आहे. त्यात नाशिक महापालिकेचा वाटा १०२ कोटी रुपयांचा आहे. त्यात महापालिकेने आर्थिक सहभाग देण्यास नकार दिला असला तरी मध्यंतरी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकला भेट दिली तेव्हा त्यांनी मेट्रोसाठी आर्थिक सहभाग घेण्यास तयारी दर्शवली होती. मात्र, महापालिकेच्या अंदाजपत्रकात प्रत्यक्षात काहीच तरतूद नसल्याचे आढळले आहे.
इन्फो...
वृक्षप्राधिकरणाचे अंदाजपत्रक गायब?
महापालिकेला अंदाजपत्रकात काही समित्यांची तरतूद करावी लागते; परंतु यंदा महापालिकेच्या अंदाजपत्रकात उद्यान विभाग म्हणून तरतूद असली तरी आयुक्त अध्यक्ष असलेल्या वृक्ष प्राधिकरण समिती म्हणून थेट तरतूद नाही. उद्यान विभागासाठी २३ कोटी १४ लाख रुपयांची तरतूद दर्शवण्यात आली आहे.