१०६ अहवाल निगेटिव्ह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 10:21 PM2020-04-22T22:21:44+5:302020-04-23T00:14:01+5:30
नाशिक : मालेगावमध्ये बुधवारी दोन कोरोनाबाधितांचे निधन झाल्याने जिल्ह्यातील मृतांचा आकडा ९ वर पोहोचला आहे. दरम्यान, बुधवारच्या दिवसभरात एकूण १०६ अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागाला काहीसा दिलासा मिळाला आहे.
नाशिक : मालेगावमध्ये बुधवारी दोन कोरोनाबाधितांचे निधन झाल्याने जिल्ह्यातील मृतांचा आकडा ९ वर पोहोचला आहे. दरम्यान, बुधवारच्या दिवसभरात एकूण १०६ अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागाला काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच मालेगावमध्ये पूर्वीच बाधित होऊन उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १० रुग्णांचा पहिला फेरतपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने मालेगावमधूनदेखील काही रुग्ण कोरोनामुक्त होऊन परतण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
बुधवारी निगेटिव्ह आलेल्या १०६ अहवालांमध्ये मालेगावचे ९७, जिल्हा रुग्णालयाचे ५, मनपाच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलचे ३ तर खासगी रुग्णालयातील एका रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे बुधवारचा दिवस अहवालांच्या बाबतीत काहीसा दिलासादायक ठरला. त्याशिवाय निगेटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये मालेगावी उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १० रुग्णांचा पहिला फेरतपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने ते रुग्ण कोरोनामुक्त होण्याची शक्यता असून, त्याबाबतचा निर्णय त्यांचा दुसरा फेरतपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच जाहीर केला जाणार आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांमध्ये मालेगावची रुग्णसंख्या वाढण्याचे प्रमाण भयावह असून, त्या संख्येला रोखण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयास केले जात आहेत. तरीदेखील मालेगावमध्ये दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. मालेगावमध्ये केवळ आठ क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. ते सर्व परिसर पूर्णपणे सील केले असतानाही आता त्या क्षेत्राबाहेर रु ग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्राची संख्या १८ वर पोहोचली असून, त्यात दिवसागणिक भर पडत आहे. नजीकच्या भविष्यात मालेगावमध्ये बाधित रुग्ण नसलेला मिळणे मुश्कील बनणार असल्यासारखी स्थिती उत्पन्न होते काय? अशी स्थिती आहे. त्यामध्ये शहरातील संगमेश्वर, मोतीबाग नाका, संजय गांधीनगर, जाधवनगर, मोमीनपुरा, दातारनगर, जुना आझादनगर, जुना इस्लामपुरा, भायखळा झोपडपट्टी या भागाचा समावेश आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेच्या सोबतच आरोग्य यंत्रणेची दमछाक होत आहे. तरीदेखील कोरोना कमी होण्याचे नाव घेत नसल्याने आरोग्य यंत्रणादेखील पुरती जेरीस आली असूनही जिवावर उदार होऊन कार्यरत आहे.
------
शहरातील नऊ अहवाल निगेटिव्ह
मालेगावमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण वाढण्याचे प्रमाण मोठे असले तरी नाशिक शहरामध्ये मात्र बाधितांची संख्या दहावर कायम आहे. दरम्यान, बुधवारी शहरातील नऊ अहवाल प्राप्त झाले असून, ते सर्वच्या सर्व निगेटिव्ह आहेत. त्यात जिल्हा रुग्णालयातील ५, मनपाच्या झाकीर हुसेन रुग्णालयातील ३, तर खासगी रुग्णालयातील एका रुग्णाचा समावेश आहे. महानगरातील बाधित संख्या न वाढल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे.