दहावी-बारावी परीक्षा ऑफलाइन; पालकांची चिंता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:15 AM2021-02-24T04:15:56+5:302021-02-24T04:15:56+5:30
नाशिक : जिल्ह्यासह राज्यभरातल कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी दहावी- बारावीच्या परीक्षा ऑफलाइन म्हणजेच प्रत्यक्ष केंद्रावरच होणार असल्याचे ...
नाशिक : जिल्ह्यासह राज्यभरातल कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी दहावी- बारावीच्या परीक्षा ऑफलाइन म्हणजेच प्रत्यक्ष केंद्रावरच होणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले असून, शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनीही याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू नाशिक जिल्ह्यातील नववी ते बारावीच्या शाळा ४ जानेवारीपासून सुरू झाल्या असून, दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासासाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही. त्यापूर्वी ऑनलाइन शिक्षण शिक्षण सुरू असले तरी विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी होईल एवढा अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. त्यामुळे पालकांना एकीकडे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची चिंता आहे, तर दुसरीकडे तयारी पूर्ण झालेली नसताना आपला पाल्य परीक्षा कशी देणार, अशी चिंता पालकांना सतावते आहे. त्यामुळे अनेक पालक आतापर्यंत पूर्ण झालेल्या अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करीत असून, परीक्षा केंद्र वाढविण्यासाठीही पालक आग्रही आहेत.
पॉइंटर-
दहावीची परीक्षा - २९ एप्रिल ते २० मे
विद्यार्थी - ९८,९४०
बारावीची परीक्षा - २३ एप्रिल ते २१ मे
विद्यार्थी - ६७,९१८
दहावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटते
कोट-१
दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासासाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही. त्याचप्रमाणे शिक्षण विभागाने कपात केलेला अभ्यासक्रम कोणता हेही अद्याप विद्यार्थ्यांना माहिती नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी पूर्ण कशी होणार. त्यामुळे शिक्षण विभागाने कपात केलेल्या अभ्यासक्रमाची माहिती सार्वजनिक करण्याची गरज आहे.
-राजेश पवार, पालक
कोट-२
कोरोनाच्या संकटात शिक्षण विभााकडून परीक्षेची तयारी केली जात आहे. गेल्या वर्षात महाविद्यालयीन परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या. त्या पद्धतीने दहावीच्या परीक्षेचे नियोजन करणयाविषयी सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन ऑनलाइन परीक्षा घेणे गरजेचे आहे.
-मुकुंद जोशी,पालक
कोट-३
अभ्यासक्रमात कपात केल्यानंतर परीक्षेत सामाविष्ट अभ्यासक्रम काय असणार आहे, याविषयी किमान विद्यार्थ्यांना माहिती दिली गेली पाहिजे, त्यानुसार विद्यार्थी परीक्षेची तयारी करू शकतील. विद्यार्थी समुपदेशानासाठी शाळांमधून तज्ज्ञ शिक्षकांची नियुक्ती होणे आवश्यक आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यापेक्षा पूर्ण झालेल्या अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे.
-गायत्री पाटील, पालक
बारावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटते
कोट -१
कोरोनाचे संकट असले तरी विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणेही आवश्यक आहे. त्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करतानाच शिक्षण विभागाने परीक्षा केंद्रे वाढविण्यासंदर्भात विचार करणे आवश्यक आहे. ज्या शाळांमध्ये परीक्षा केंद्र नाही, अशा शाळांनाही परीक्षा घेण्याची परवानगी देतानाच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे.
-समाधान आडके, पालक
कोट -२
विद्यार्थ्यांची परीक्षेची जागा सर्व पेपरसाठी एकाच वर्गखोलीत आणि एकाच बाकावर येईल यादृष्टीने शिक्षण विभागाने नियोजन करावे, त्याचप्रमाणे परीक्षेचा कालावधी वाढला तरी चालेल; परंतु एकाच वेळी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही, यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.
-विकास जाधव, पालक
कोट -३
कोरोनाचा प्रभाव वाढला, तर शिक्षण विभागाने ऑनलाइन परीक्षेची तयारी ठेवायला हवी, विद्यार्थ्यांना संकटाच्या परिस्थितीत परीक्षेला पाठविताना पालकच खंबीर नसतील, तर ते मुलांचे मनोधैर्य कसे वाढविणार. त्यामुळे परीक्षा सुरक्षित वातावरणात होतील याविषयी आश्वस्त केल्यानंतरच ऑफलाइन परीक्षा घेण्यात याव्यात.
-रंजना गायकवाड, पालक