११९ अभियंते नियुक्तीच्या प्रतीक्षेत

By admin | Published: May 19, 2014 11:51 PM2014-05-19T23:51:12+5:302014-05-20T00:30:46+5:30

टोलवाटोलवी : उत्तीर्ण होऊनही नियुक्ती देण्यास टाळाटाळ

11 9 engineers awaiting appointment | ११९ अभियंते नियुक्तीच्या प्रतीक्षेत

११९ अभियंते नियुक्तीच्या प्रतीक्षेत

Next

टोलवाटोलवी : उत्तीर्ण होऊनही नियुक्ती देण्यास टाळाटाळ
नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने जलसंपदा विभागासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही जलसंपदा विभागाकडून अद्यापही नियुक्ती न देण्यात आल्याने सुमारे ११९ अभियंत्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या वर्षभरापासून हे अभियंते नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत; मात्र अद्यापही निवडप्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नाही.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून जलसंपदा विभागासाठी महाराष्ट्र अभियांत्रिकी स्थापत्य सेवा गट-१ साठी २०१२ मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल १२ जून २०१३ रोजी जाहीर करण्यात आला होता. या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे लोकसेवा आयोगाने शिफारसपात्र उमेदवारांची यादी १५ जून २०१३ रोजी जलसंपदा विभागाकडे पाठविली होती. आयोगाच्या पत्रानंतर या विभागाने लागलीच नियुक्तीप्रक्रिया सुरू केली; मात्र ही प्रक्रिया अद्यापही अंतिम टप्प्यात आलेली नाही. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून पात्र उमेदवार नियुक्ती पत्राची वाट पाहत आहेत.
आयोगाने पात्र उमेदवारांची यादी जलसंपदा विभागाला दिल्यानंतर त्यांच्या मागणीनुसार उमेदवारांनी कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे. त्याचप्रमाणे वैद्यकीय तपासणी, पोलीस तपासणीदेखील पूर्ण केलेली आहे. ही सर्व पूर्तता करीत असताना, महिनाभरात नियुक्ती दिली जाईल असे उमेदवारांना सांगण्यात आले होते. त्यामुळे अनेक उमेदवारांनी आपल्या पूर्वीच्या नोकरीच्या ठिकाणी राजीनामा देऊन या नोकरीची अपेक्षा केली होती; परंतु आता वर्षभराचा काळ होत आला तरी एकाही उमेदवारास नियुक्ती पत्र देण्यात आलेले नाही.
जलसंपदा विभागाकडून होत असलेली दिरंगाई आणि थांबलेली निवडप्रक्रिया यामुळे अनेक उमेदवारांना काय करावे असा प्रश्न पडला आहे. अगोदरच हातची नोकरी गेलेली, त्यातही नियुक्तीबाबत अद्यापही स्पष्टता नसल्याने पात्रता असूनही अभियंत्यांवर बेरोजगार होण्याची वेळ आलेली आहे. तरी जलसंपदा विभागाने उमेदवार निवडीची पाऊले वेगाने उचलावीत, अशी आर्त मागणी या अभियंत्यांकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)
या झाल्या आहेत प्रक्रिया...
- २८ जुलै २०१३ - उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी.
- ०८ ऑगस्ट २०१३ - उमेदवारांची वैद्यकीय चाचणी पूर्ण.
- १८ ऑगस्ट २०१३ - उमेदवारांकडून पसंती क्रमांक घेण्यात आला.
- पोलीस व्हेरिफिकेशनदेखील पूर्ण.
सहायक अभियंत्याची विभागनिहाय रिक्त पदे
औरंगाबाद - १५२
नागपूर - ५२
अमरावती - १०२
कोंकण - ६८
नाशिक - १४३
पुणे - १६०

Web Title: 11 9 engineers awaiting appointment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.