सराईत चोरट्यांकडून ११ दुचाकी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 01:38 AM2019-01-13T01:38:46+5:302019-01-13T01:39:05+5:30
कार्यालय, महाविद्यालयांमधील वाहनतळात उभ्या केलेल्या तसेच शहरातील वर्दळीच्या ठिकाणांहून नागरिकांच्या दुचाकी शिताफीने लंपास करत बनावट क्रमांक टाकून त्यांची विक्री करण्याचा ‘उद्योग’ स्थानिक गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केला आहे. मखमलाबाद, चांदशी शिवारातून दोघा संशयितांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून चोरीच्या ११ दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
नाशिक : कार्यालय, महाविद्यालयांमधील वाहनतळात उभ्या केलेल्या तसेच शहरातील वर्दळीच्या ठिकाणांहून नागरिकांच्या दुचाकी शिताफीने लंपास करत बनावट क्रमांक टाकून त्यांची विक्री करण्याचा ‘उद्योग’ स्थानिक गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केला आहे. मखमलाबाद, चांदशी शिवारातून दोघा संशयितांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून चोरीच्या ११ दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
याबाबत पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने चांदशी येथून बनावट क्रमांक असलेली मोटारसायकल वापरणारे संशयित गोविंद श्याम पवार (१९, रा. चांदशी, मूळ सय्यद पिंप्री), भूषण ज्ञानेश्वर पिंगळे (१९, तवली फाटा, मखमलाबाद) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता एक बजाज पल्सर दुचाकी (बनावट क्रमांकाची) आढळून आली. दोन महिन्यांपूर्वी या दोघा चोरट्यांनी कसारा येथून ही दुचाकी चोरी केली होती.
जिल्ह्णातील ग्रामीण भागातील दुचाकी चोरीचा छडा
लावण्यास ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला या कारवाईमुळे पुन्हा चांगले यश आले आहे. या चोरट्यांनी
सिन्नर, गिरणारे, मातोरी, दरी, मुंगसरा, वडाळीभोई, चांदवड, वणी या
ग्रामीण भागासह शहरातून देखील काही दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली आहे. ‘खाकी’चा हिसका दाखविल्यानंतर चोरट्यांनी दुचाकी दडविलेल्या जागेचा पत्ता सांगितला.
चोरट्यांनी चोरी केलेल्या दुचाकी पेठरोड येथील रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात दडवून ठेवल्या होत्या. जंगलात ज्या पद्धतीने दुचाकी लपविल्या होत्या ती पद्धत पोलिसांना चक्रावून टाकणारी
ठरली.
मात्र पोलिसांनी हा साठा शोधून काढला. दोन पल्सर, चार हिरो स्प्लेंडर, बजाज पल्सर-२२०, सीडी-१००, पॅशन-प्रो, सुपर स्प्लेंडर, बजाज डिस्कव्हर प्रत्येकी एक अशा एकूण ३ लाख ६५ हजार रुपये किमतीच्या ११ दुचाकी ग्रामीण पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
या दोघा सराईत गुन्हेगारांपैकी पवारविरुद्ध यापूर्वी शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या संशयित आरोपींची पोलिसांनी ‘खास शैली’त झडती घेतली असता त्यांच्याकडून सात गुन्हे उघडकीस आले आहेत. नाशिक तालुका, वणी, सिन्नर औद्योगिक वसाहत, कसारा, म्हसरूळ पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्हे उघडकीस आले आहेत. हे दोघे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याकडून अधिक गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
सात गुन्हे उघडकीस