सात महिन्यांत ११ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:18 AM2021-08-12T04:18:43+5:302021-08-12T04:18:43+5:30

नाशिक: आर्थिक संकट आणि नापिकीच्या फेऱ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यावर कोरोनामुळे परिणाम झाला असला तरी या संकटाला धीराने तोंड ...

11 farmers commit suicide in seven months | सात महिन्यांत ११ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

सात महिन्यांत ११ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Next

नाशिक: आर्थिक संकट आणि नापिकीच्या फेऱ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यावर कोरोनामुळे परिणाम झाला असला तरी या संकटाला धीराने तोंड देत काही शेतकरी सावरलेदेखील आहेत. मात्र गेल्या सात महिन्यांत अनेकविध कारणांनी अकरा शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले. मागील वर्षी जिल्ह्यात ४४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, तर यावर्षी जुलैअखेर ११ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली.

शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात असल्यातरी शेतकरी आत्महत्येच्या घटना काही प्रमाणात घडतच आहेत. नाशिक जिल्ह्यातही गेल्या सात महिन्यांच्या कालावधीत शेतकरी आत्महत्येच्या अकरा घटना घडलेल्या असून, यातील बहुतेक सर्वच घटना या आदिवासी तालुक्यांमध्ये घडून आलेल्या आहेत. जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार बागलाण तालुक्यात २, देवळा १, दिंडोरी २, मालेगाव १, निफाड ४ तर सुरगाणा येथे १ याप्रमाणे अकरा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. जानेवारी महिन्यात ५, फेब्रुवारी २, मार्च १, मे १, जून १ तर जुलै महिन्यात १ याप्रमाणे आत्महत्येच्या घटना घडलेल्या आहेत.

शासकीय नियमाप्रमाणे पात्र शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली जात असून, शासनाकडे याबाबतचे प्रस्ताव पाठविण्यात आलेले आहेत. शेतकरी आत्महत्येच्या निकषानुसार यातील चार प्रकरणे अपात्र ठरविण्यात आले आहे, तर चार प्रकरणे शासनाकडे प्रलंबित आहेत. शासनाकडून मदत प्राप्त होताच त्यांना मदत दिली जाणार आहे.

मागील दोन वर्षांपासून राज्यात कोरोनाचा प्रभाव असल्यामुळे सर्वसामान्यांच्या जगण्याचे संदर्भही बदलून गेले आहेत. शहरी आणि ग्रामीण भागालादेखील कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. यंदा नाशिक ग्रामीण भागात कोरोनाचा प्रभाव अधिक झाला असला तरी त्यातूनही अनेकांनी या संकटाचा धीराने सामना केला. त्यामुळे या काळातील घटना कमी आहेत.

--इन्फो--

मागील वर्षी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या ४४ घटना घडलेल्या आहेत. त्यामध्ये ऑगस्ट २०२० मध्ये सर्वाधिक १० घटना घडलेल्या आहेत. नोव्हेंबरमध्ये ८, तर डिसेंबरमध्ये ६ घटना घडल्या आहेत. मागील वर्षी नाशिक, बागलाण, चांदवड, सिन्नर, दिंडोरी, कळवण, मालेगाव, नांदगाव, निफाड, त्र्यंबकेश्वर, येवला आणि पेठ येथे आत्महत्येच्या घटना घडलेल्या आहेत. निफाड तालुक्यात सर्वाधिक १३ आत्महत्येच्या घटना घडल्या, त्यातील ३ अपात्र तर १० प्रकरणे पात्र ठरली.

Web Title: 11 farmers commit suicide in seven months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.