कारागृहात साकारतेय ११ फूटी गणेशमूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 01:08 AM2019-07-17T01:08:06+5:302019-07-17T01:08:43+5:30
कळत-नकळत घडलेल्या घटनेमुळे कारागृहात शिक्षा भोगणारा कैदी हादेखील माणूसच असतो. कारागृहातील कैद्यांना झालेली शिक्षा व पश्चाताप लक्षात घेऊन त्यांना सुधारण्यासाठी व त्यांच्या कलेला वाव देण्यासाठी राज्यशासन, कारागृह प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविले जातात. यातूनच नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कागदी लगदा व शाडूमातीची पर्यावरणपूरक ११ फुटी श्री गणपतीची व छोट्या-मोठ्या हजारांहून अधिक गणरायाच्या मूर्तींवर अखेरचा हात फिरविला जात आहे.
मनोज मालपाणी । लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : कळत-नकळत घडलेल्या घटनेमुळे कारागृहात शिक्षा भोगणारा कैदी हादेखील माणूसच असतो. कारागृहातील कैद्यांना झालेली शिक्षा व पश्चाताप लक्षात घेऊन त्यांना सुधारण्यासाठी व त्यांच्या कलेला वाव देण्यासाठी राज्यशासन, कारागृह प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविले जातात. यातूनच नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कागदी लगदा व शाडूमातीची पर्यावरणपूरक ११ फुटी श्री गणपतीची व छोट्या-मोठ्या हजारांहून अधिक गणरायाच्या मूर्तींवर अखेरचा हात फिरविला जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रत्नागिरी जिल्ह्यातील वेसवी गावातील मूर्तिकार सागर भरत पवार हा एका गुन्ह्यात शिक्षा भोगत आहे. मूर्तिकार सागर पवार याचा पनवेलला मूर्ती बनविण्याचा कारखाना होता. कारागृह प्रशासनाने मूर्तिकार सागर पवार यांच्यात झालेला बदल व त्याची कलाकारी लक्षात घेऊन गेल्या काही वर्षांपासून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक लहान-मोठ्या श्री गणरायाच्या मूर्ती बनवून त्यांची विक्री केली जाते. त्यामुळे कैदी कलाकारांच्या कलेला वाव मिळण्याबरोबर कारागृह प्रशासनाला आर्थिक उत्पन्नही मिळते. तसेच संबंधित कैद्यालादेखील आर्थिक मोबदला मिळतो. गेल्या एक-दोन वर्षांपासून कारागृहात कैद्यांनी बनविलेल्या पर्यावरणपूरक श्री गणपतीच्या मूर्तीला भाविकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गेल्यावर्षी कारागृहात मूर्तिकार सागर भरत पवार व त्यांच्या सहकारी कैद्यांनी १४०० श्री गणपतीच्या मूर्ती विकल्याने कारागृहाला १३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळून जवळपास सहा लाख रुपयांचा नफा झाला होता.
मूर्तीवर अखेरचा हात
कारागृहात टिटवाळा, लालबाग, दगडूशेठ हलवाई, आसन गणेश, उंदीर रथावरील गणेश, देता-घेता गणेश, सिंह फर्निचर गणेश अशा विविध रूपातील हजारो मूर्ती सागर पवार व त्याच्या १२ सहकारी कैद्यांनी साकारल्या असून, त्यांच्यावर अखेरचा हात फिरवला जात आहे.