११ केव्हीच्या केबलचा झाला धुव्वा अन् आठ तास 'बत्ती गूल'
By अझहर शेख | Published: October 26, 2023 03:40 PM2023-10-26T15:40:29+5:302023-10-26T15:42:50+5:30
वडाळागावात कधी दिवसा तर कधी मध्यरात्री किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेस वीजपुरवठा खंडित होतो अन् येथील रहिवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. वीज गायब झाली की उकाड्यासह डासांच्या उपद्रवाने नागरिक हैराण होतात. वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याच्या समस्येवर महावितरणला तोडगा काढता येऊ शकलेला नाही.
नाशिक : वडाळागाव अन् वीज गायब हे आता जुनं समीकरण बनलं आहे. या गावातील लोकांना जणू एखाद्या आदिवासी पाड्याप्रमाणे विजेचा पुरवठा होऊ लागला आहे. गुरुवारचा (दि. २६) दिवस उजाडला अन् सकाळी सव्वासात वाजेच्या ठोक्याला संपूर्ण गावाची वीज गायब झाली. येथील पोलिस चौकीजवळच्या जय मल्हार कॉलनीत ११ केव्ही क्षमतेची अति उच्चदाबाच्या भूमिगत केबलचा ‘बार’ झाला. यामुळे तब्बल दुपारी दोन वाजेपर्यंत ‘बत्ती गूल’ झालेली होती.
वडाळागावात कधी दिवसा तर कधी मध्यरात्री किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेस वीजपुरवठा खंडित होतो अन् येथील रहिवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. वीज गायब झाली की उकाड्यासह डासांच्या उपद्रवाने नागरिक हैराण होतात. वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याच्या समस्येवर महावितरणला तोडगा काढता येऊ शकलेला नाही. तात्पुरत्या प्रमाणात बिघाड दूर केला की, पुन्हा दुसऱ्या ठिकाणी काहीतरी बिघाड होतो नाहीतर मुख्य उपकेंद्रावरून ‘लोड शेडिंग’च्या नावाखाली वडाळागावचा वीजपुरवठा रोखला जातो. या समस्येला कंटाळून आता वडाळावासीयांनी जितके तास वीज महिनाभरातून गायब राहील तितके रूपये वीज बिलातून महावितरणने कपात करावी, अशी संतप्त मागणी केली आहे.