निफाड तालुक्यातील ११ गावांना ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा
By Admin | Published: July 17, 2016 01:09 AM2016-07-17T01:09:57+5:302016-07-17T01:17:25+5:30
निफाड तालुक्यातील ११ गावांना ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा
निफाड : तालुक्यात धार्मिक व पौराणिक संदर्भ असलेल्या ११ गावांचा ‘क’ वर्ग पर्यटनस्थळात समावेश करण्यात आला आला. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत त्यास मान्यता देण्यात आली आहे.
निफाड तालुक्यातील करंजगाव येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर, खेडेचे हिंगलाज देवीमाता मंदिर, म्हाळसाकोरेचे म्हाळसादेवी मंदिर, शिवडीचे श्रीराम मंदिर, नांदुर्डीचे वरदविनायक गणपती मंदिर, साकोरे मिगचे खंडेराव महाराज मंदिर, मौजे सुकेणेचे दत्तमंदिर, चाटोरीचे शनि मंदिर, कोठुरेचे बाणेश्वर मंदिर, भुसेचे म्हसोबा महाराज मंदिर, पालखेडचे खंडेराव महाराज मंदिर आदि मंदिराचा यात समावेश आहे. या तीर्थस्थळी व यात्रोत्सवास दरवर्षी भाविकांची प्रचंड गर्दी होत असते. मात्र यात्रोत्सवाला होणाऱ्या गर्दीच्या तुलनेत सोयी सुविधा मिळत नाहीत. या गावांना शासनाच्या ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात यावा, शासनाच्या माध्यमातून विविध विकासयोजना राबविल्या जाव्यात, याकरिता संबंधित गावातील ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत ठराव करून त्याबाबत जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव सादर केला होता. त्यास आमदार अनिल कदम यांनी विशेष शिफारस करून सदर गावे ‘क’वर्ग पर्यटन स्थळात समाविष्ट करणेबाबत पाठपुरावा केला. त्यानुसार आमदार अनिल कदमांनी जिल्हा नियोजन मंडळाकडे पालकमंत्री गिरीश महाजनांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत सदर गावे ‘क’ वर्ग पर्यटन स्थळ म्हणून समाविष्ट करावित असा ठराव मांडला. त्यास नियोजन मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते मान्यता देण्यात आली. निफाड तालुक्यातील अकरा गावांचा ‘क’ वर्ग पर्यटन स्थळ म्हणून समावेश करण्यात आला आहे. यामुळे या धार्मिक तीर्थक्षेत्रांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.(वार्ताहर)