११० प्राथमिक आरोग्य केंद्रे धोकेदायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:13 AM2021-01-17T04:13:52+5:302021-01-17T04:13:52+5:30
भंडारा येथील दुर्घटनेने संपूर्ण आरोग्य यंत्रणेचे पितळ उघडे पडल्याने शासनाने त्याची गंभीर दखल घेतली असून, घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्वच ...
भंडारा येथील दुर्घटनेने संपूर्ण आरोग्य यंत्रणेचे पितळ उघडे पडल्याने शासनाने त्याची गंभीर दखल घेतली असून, घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्वच शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये बसविण्यात आलेल्या अग्निशमन यंत्रांची तपासणी झाली किंवा नाही याची माहिती शासनाने मागविली आहे. त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रांची माहिती मागविली असता, सुमारे ११० आरोग्य केंद्रांत गेल्या दोन वर्षांपासून अग्निशमन यंत्रणेची तपासणी झालेली नाही.
अग्निशमन यंत्रांची तपासणी करण्याबरोबरच रुग्णालयांच्या बांधकामाच्या संरचना याचीही तपासणी करून त्यांच्याकडून ना-हरकत दाखला घेण्याचे तसेच शॉकसर्किटमुळेदेखील दुर्घटना घडू शकतात, हे लक्षात घेऊन वीज उपकरणांचीही देखभाल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
चौकट===
जिल्ह्यातील सर्वच आरोग्य केंद्रांमध्ये अग्निरोधक यंत्र बसविण्यात आले असून, त्याच्या देखभाल व दुरुस्तीचे काम फेबर सिंदुरी या कंपनीला देण्यात आले आहे. गेल्या पाच वर्षांत कोणत्याही आरोग्य केंद्रात आगीची दुर्घटना घडलेली नाही. तरीदेखील येत्या एक महिन्यात सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांची तपासणी करण्याच्या सूचना सर्व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
- डॉ. कपिल आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी
-------
बागलाण-११, चांदवड- ५, देवळा-५, दिंडोरी-१०, इगतपुरी-८, कळवण-९, मालेगाव-९, नांदगाव-५, नाशिक-५, येवला-६, त्र्यंबक-७, पेठ-७, सिन्नर-७, सुरगाणा-८, निफाड-१०