४७ केंद्रांवर ११ हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2022 01:07 AM2022-01-24T01:07:18+5:302022-01-24T01:07:38+5:30
महाराष्ट्र लोक सेवा आयोग राज्य सेवा पूर्व परीक्षा शहरातील ४७ केंद्रांवर सुरळीत पार पडली. सकाळी आणि दुपार सत्रात घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी उत्तर महाराष्ट्रातून सुमारे ११ हजार विद्यार्थी आले होते. सकाळी पेपर दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी ९० विद्यार्थ्यांनी दुपारचा पेपर दिलाच नाही.
नाशिक: महाराष्ट्र लोक सेवा आयोग राज्य सेवा पूर्व परीक्षा शहरातील ४७ केंद्रांवर सुरळीत पार पडली. सकाळी आणि दुपार सत्रात घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी उत्तर महाराष्ट्रातून सुमारे ११ हजार विद्यार्थी आले होते. सकाळी पेपर दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी ९० विद्यार्थ्यांनी दुपारचा पेपर दिलाच नाही. परीक्षेच्या दोन दिवस आगोदरच परीक्षेच्या वेळापत्रकात बदल झाल्याची अफवा पसल्याने, विद्यार्थी संभ्रमात असताना राज्यसेवा आयोगाने परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार दि. २३ रोजीच होणार असल्याचे जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेसाठी १७,९१६ परीक्षार्थी बसले झाले होते. जिल्ह्यातील ४७ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी दोन्ही पेपरला गैरहजर राहिलेल्या उमेदवारांची संख्या अधिक होती. सहा हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते.
सकाळी दहा ते बारा आणि दुपारी तीन ते सायंकाळी ५ अशा दोन सत्रांत परीक्षा घेण्यात आली. सामान्य अध्ययन या विषयाची परीक्षा सकाळच्या सत्रात घेण्यात आली. या सत्रात १७,९१६ पैकी ११,४९३ उमेदवारांनी परीक्षा दिली, तर दुपारच्या सत्रात सीसॅटच्या परीक्षेला ११,४०३ उमेदवार हजर होते, तर ६,५१३ उमेदवारांनी दांडी मारली. सकाळ सत्रात परीक्षा दिलेल्यांपैकी ९० उमेदवारांनी दुपारचा पेपर न देताच निघून गेले.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी पार पाडण्यात आली. या परीक्षेसाठी २,१०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती, तर कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता, सर्व प्रकारच्या प्रतिबंधात्मक नियमांची उपायोजना करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनीही मास्क आणि सॅनिटाझरचा वापर केला.