११२ ई-टॉयलेट्स, पीपीपी तत्त्वावर उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 01:09 AM2018-10-24T01:09:51+5:302018-10-24T01:10:29+5:30
शहरात आता ई-पार्किंगपाठापोठ ई-टॉयलेट साकारण्यात येणार असून, पीपीपी तत्त्वावरील या कामासाठी महापालिकेने निविदा मागविल्या आहेत.
नाशिक : शहरात आता ई-पार्किंगपाठापोठ ई-टॉयलेट साकारण्यात येणार असून, पीपीपी तत्त्वावरील या कामासाठी महापालिकेने निविदा मागविल्या आहेत. शहरात अपुरे प्रसाधन गृह आणि शौचालय यामुळे नागरिकांची कुंचबना होत होती. विशेषत: महिलांची अडचण होत असल्याने राइट टू पी चळवळीअंतर्गत शहरात प्रसाधनगृहांची संख्या वाढविण्याची मागणीदेखील होत होती. स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आडके-आहेर यांनी यासंदर्भात अंदाजपत्रकात तरतूद केली होती. त्याची अंमलबजावणी करण्यास आता प्रारंभ झाला असून, महपालिकेने निविदा मागविल्या आहेत. शहरात एकूण ११२ ठिकाणी पे अॅँड यूज तत्त्वावरील हे ई-टॉयलेट असतील. पीपीपी तत्त्वावर ते उभारण्यात येणार असून, खासगी भागीदार ते उभारतील. ई-टॉयलेटचे शुल्क तसेच शौचालयावरील जाहिरातीच्या माध्यमातून ते उत्पन्न मिळवतील. महापालिकेच्या वतीने सिंंहस्थ कुंभमेळ्यातच अशाप्रकारची कामे करण्याची योजना होती; मात्र त्यावेळी ते शक्य झाले नव्हते. आता मात्र शहर स्मार्ट करण्यात येत असून, महापालिकेने ई-टॉयलेट उभारण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे.