कालबद्ध पदोन्नतीचा ११४ ग्रामसेवकांना लाभ
By admin | Published: September 19, 2015 11:29 PM2015-09-19T23:29:38+5:302015-09-19T23:30:39+5:30
ग्रामपंचायत विभागाची कार्यवाही
नाशिक : सलग १२ वर्षे आणि २४ वर्षे पदोन्नतीच्या कार्यवाहीपासून लांब असलेल्या जिल्ह्यातील ७७ ग्रामसेवक आणि ३७ ग्रामविकास अधिकारी यांना शनिवारी (दि. १९) कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मिळाल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी दिली.
विशेष म्हणजे कालच चार ग्रामविकास अधिकाऱ्यांना विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) पदावर पदोन्नती देण्यास मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी मान्यता दिली. चार ते पाच दिवसांपूर्वीच यासंदर्भात पदोन्नतीचा प्रस्ताव ग्रामपंचायत विभागाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मान्यतेसाठी पाठविला होता. ग्रामपंचायत विभागांतर्गत कार्यरत असलेल्या ७७ ग्रामसेवकांना सलग १२ वर्षांच्या सेवेत तर ३७ ग्रामविकास अधिकाऱ्यांना सलग २४ वर्षांपासून पदोन्नतीचा लाभ मिळालेला नव्हता. पदोन्नतीपासून लांब असलेले ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांना एकेक पदोन्नती देण्याबाबतचा प्रस्ताव ग्रामपंचायत विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्याकडे पाठविला होता. शनिवारी (दि. १९) बनकर यांनी या कालबद्ध पदोन्नतीच्या प्रस्तावाला मान्यता दिली. जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष कैलास वाकचौरे यांनी बनकर, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांचे कालबद्ध पदोन्नती दिल्याबद्दल आभार मानले. (प्रतिनिधी)