११९५ ग्राहकांची ‘माय स्टॅम्प’ला पसंती

By admin | Published: September 12, 2014 12:36 AM2014-09-12T00:36:21+5:302014-09-12T00:36:21+5:30

११९५ ग्राहकांची ‘माय स्टॅम्प’ला पसंती

1195 Customers Prefer 'My Stamp' | ११९५ ग्राहकांची ‘माय स्टॅम्प’ला पसंती

११९५ ग्राहकांची ‘माय स्टॅम्प’ला पसंती

Next



नाशिक : भारतीय टपाल विभागाने जास्तीत जास्त लोकांना जोडण्याबरोबरच महसुलात वाढ होण्यासाठी सुरू केलेल्या ‘माय स्टॅम्प’ योजनेचा प्रभाव आता ओसरत चालला असून, नाशिक शहरात गेल्या नऊ महिन्यांत केवळ ११९५ ग्राहकांनी या योजनेला प्रतिसाद दिला आहे. ग्राहकांनी पाठ फिरविल्याने नाशिकच्या मुख्य टपाल कार्यालयात ‘माय स्टॅम्प’ची सुविधा बंद करण्यात आली असून, ग्राहकांनी मागणी केल्यास त्यांना मुंबईहून माय स्टॅम्प उपलब्ध करून दिले जात आहेत. दरम्यान, भूतानसारख्या छोट्या देशात मात्र ‘माय स्टॅम्प’ योजनेत ग्राहकाच्या छायाचित्राचेच तिकीट प्रदर्शित केले जात असल्याने भूतान सरकारच्या टपाल विभागाला चांगली कमाई होत आहे.
‘माय स्टॅम्प’ योजनेअंतर्गत टपाल तिकिटाच्या शेजारी ग्राहकाला स्वत:चे छायाचित्र छापून मिळते. भारतीय टपाल विभागाने सर्वप्रथम सन २००० मध्ये कोलकाता येथील इंडिपेक्स प्रदर्शनात ही योजना आणली. पुढे सन २०११ मध्ये दिल्लीतील विश्व डाक प्रदर्शनात ही योजना पुन्हा आणण्यात आली परंतु फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. मागील वर्षी २०१३ मध्ये मध्य प्रदेशात ही योजना अंमलात आणली गेली. नाशिक शहरात १४ डिसेंबर २०१३ रोजी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. ग्राहकाला तीनशे रुपयांत स्वत:चे छायाचित्र असलेली बारा टपाल तिकिटे उपलब्ध करून दिली जात असत. ऐतिहासिक वास्तू, वन्यजीव, फुले, पर्यटनस्थळे, विमाने, बारा राशी यांच्या तिकिटांशेजारी ग्राहकाला स्वत:चे छायाचित्र छपाई करून दिले जात असे. गेल्या नऊ महिन्यांत नाशिकच्या जनरल पोस्ट आॅफिसमध्ये ११९५ ग्राहकांनी ‘माय स्टॅम्प’ योजनेत सहभाग नोंदविला. एप्रिल अखेरपर्यंत या योजनेला प्रतिसाद मिळत राहिला. परंतु नंतर या योजनेचा प्रभाव ओसरला. तीनशे रुपयांत बारा तिकिटे आर्थिकदृष्ट्या महाग पडत असल्याने ग्राहकांनी त्याकडे पाठ फिरविली. आता कुणी ग्राहकांनी मागणी केल्यास त्यांना मुंबईहून तिकिटे उपलब्ध करून दिली जात आहेत. भारतात ही योजना सुरू होण्यापूर्वी अन्य देशांत काही वर्षांपासून योजना राबविली जात आहे. त्यात भूतानसारखा छोटा देश सदर योजना राबविण्यात आघाडीवर असून, पर्यटकांचे स्वत:च्या छायाचित्राचेच टपाल तिकीट प्रकाशित केले जात असल्याने त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. भूतानप्रमाणेच भारतातही जिवंत व्यक्तीचे टपाल तिकीट प्रकाशित करण्याची योजना राबविण्याची मागणी फिलाटेलिक सोसायटीच्या सदस्यांकडून होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 1195 Customers Prefer 'My Stamp'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.