१२ ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल
By admin | Published: June 17, 2017 12:08 AM2017-06-17T00:08:47+5:302017-06-17T00:09:03+5:30
नांदूरशिंगोटे : आॅक्टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत सिन्नर तालुक्यात मुदत संपणाऱ्या १२ ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदूरशिंगोटे : आॅक्टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत सिन्नर तालुक्यात मुदत संपणाऱ्या १२ ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. प्रभाग रचनेसाठी तहसील कार्यालयाकडून सात अध्यासी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गूगल मॅपद्वारे यावेळेस प्रभाग रचना केली जाणार असल्याचे समजते.
फेब्रवारी महिन्यात तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा राजकीय रणधुमाळी पाहण्यास मिळणार आहे. आॅक्टोबर २०१७ ते फेबु्रवारी २०१८ या कालावधीत बारा ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. ग्रामपंचायतीच्या प्रभागरचनेसाठी तहसील कार्यालयाकडून दोन ग्रामपंचायत मिळून एक अध्यासी अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. त्यांना त्या गावातील ग्रामसेवक व तलाठी या कामी मदत करणार आहेत. सन २०११ ची जनगणना ग्राह्य धरून प्रभाग व आरक्षण काढले जाणार आहे. अनुसूचित जाती व जमातींचे आरक्षण संबंधित गावातील ग्रामसेवक व तलाठी हे स्थळ पाहणी करून निश्चित करणार आहेत. प्रभाग रचनेनंतर अनुसूचित जाती जमाती व नागरिकांना मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. अध्यासी अधिकाऱ्यांनी संबंधित गावात २७ जूनच्या आत विशेष सभा घेऊन त्यांचा अहवाल तहसील कार्यालयाकडे जमा करायचा आहे. तलाठी व ग्रामसेवक यांना गावात दवंडी देऊन याची ग्रामस्थांना माहिती द्यावयाची आहे.
प्रभाग रचनेनंतर हरकती व सूचना मागविण्यासाठी ४ जुलै २०१७ रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हरकती सादर करण्यासाठी ११ जुलै २०१७ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्राप्त झालेल्या हरकती व सूचना १५ जुलैपर्यंत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. त्यावर निर्णय घेऊन अंतिम निर्णयासाठी २५ जुलै रोजी हरकतींचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेले प्रस्ताव तपासणीनंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे ३१ जुलै रोजी प्रभागरचना व आरक्षणास अंतिम मान्यता देण्यात येणार आहे. अंतिम प्रभागरचना ३ आॅगस्ट २०१७ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.