१२ गावे, ४० वाड्या टंचाईच्या खाईत
By Admin | Published: April 21, 2017 11:53 PM2017-04-21T23:53:29+5:302017-04-21T23:53:50+5:30
पर्जन्यमान सरासरी २४०० मि.मी.पेक्षा अधिक असूनही त्र्यंबकेश्वर तालुक्याला दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
वसंत तिवडे त्र्यंबकेश्वर
पर्जन्यमान सरासरी २४०० मि.मी.पेक्षा अधिक असूनही त्र्यंबकेश्वर तालुक्याला दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यात भरीस भर म्हणून पाणीपुरवठा योजनाही धूळ खात पडल्याने पाण्यापासूनच वंचित राहण्याची वेळ आली आहे. तालुक्यात पाणीटंचाईचे आतापर्यंत प्रस्ताव येत नव्हते. आता मात्र अनेक प्रस्ताव येत आहेत, तर वेळ मिळेल तसा तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता प्रस्तावांची शहानिशा करण्यासाठी टंचाईग्रस्त गावांचा दौरा करीत आहेत. आज कागदोपत्री ११ प्रस्ताव दाखल झाले असून, ११ ते १२ गावे व ४० वाड्या-पाडे टंचाईच्या खाईत आहेत.तालुक्यातील बव्हंशी गावांत पाणीटंचाईने उग्ररूप धारण केले आहे. आश्चर्याची बाब अशी की, अजून प्रशासनाने उपाययोजना म्हणून एकही टॅँकर सुरू केले नाही. तालुक्याचे तपमान सध्या ३६ ते ३९ अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत जात असून, मे महिन्यात ते अजून वाढल्यास आश्चर्य वाटायला नको. सध्या पाणीटंचाईने तालुक्यात जोर धरला असून, त्र्यंबक पंचायत समितीकडे २-३ दिवसाआड पाणीटंचाई प्रस्ताव दाखल होत आहेत. दस्तुरखुद्द त्र्यंबकेश्वर शहरातदेखील दिवसाआड पाणीपुरवठ्याची वेळ आली आहे. यावरून तालुक्यातील टंचाई स्थितीची कल्पना यावी.
पाणीटंचाईच्या प्रस्तावाची खातरजमा किचकट प्रक्रि या असून, एखाद्या गावचा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर प्रस्तावाची खातरजमा करण्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी व लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता या तिघांची समिती संबंधित गावांना भेट देऊन प्रथम दोन कि.मी. परिसरात पाण्याचे उद्भव आहेत काय, असल्यास ते पाणी किती दिवस पुरेल याचा अंदाज घेऊन ‘सध्या भागवून घ्या’ असे प्रशासनाचे वेळकाढू धोरण असते.
वास्तविक ग्रामसेवक शासनाचा सेवक असतो. प्रस्ताव देताना पूर्ण शहानिशा करूनच प्रस्ताव देतात. मग पुनर्तपासणीचे नाटक कशाला, असा सवाल उपस्थित होतो आहे. याचाच अर्थ तुमचा तुमच्याच सेवकांवर विश्वास नाही हे सिद्ध
होते.
तालुक्यात आज मेटघर किल्ला व मेटघर ग्रामपंचायतीअंतर्गत सहा वाड्या, पाडे याशिवाय ओझरखेडसह कोशिमपाडा, तर मूळवडसह करंजपाणा, चौरापाडा वळण, सावरपाडा आदी गावांचा समावेश आहे. शिवाय गंगाद्वार, विनायकखिंड, महादरवाजा, सुपलीची मेट, जांबाची वाडी, पठारवाडी, बेरवळ पैकी हट्टीपाडा, कुत्तरमाळ, पांगारपाणा, गारमाळ, टोकरशेत, वाघचौडा, कौलपोंडा, चामिलमाळ, उंबरदरी, हिवाळी, घोडीपाडा-१, घोडीपाडा-२, सोमनाथनगर, चिंचओहळ पैकी शेवग्याचा पाडा, बरड्याचा पाडा, बेलीपाडा, बाभळीचा माळ, बेहडमाळ, काकडपाणा-१, काकडपाणा-२, डोळओहळ, निळउंबर, बोरीपाडा, शिंदपाडा, बालापाडा अशा गावांचे प्रस्ताव येत आहेत. तालुक्यातील अनेक गावे, वाड्या, पाडे टंचाईच्या खाईत आहेत. तथापि, या दुर्गम भागातील प्रस्ताव न आल्याने त्यांच्याकडे लक्ष दिले जात नाही. ४-५ कि.मी.वरून का होईना बिचारे आपल्या पाण्याची सोय ते करीत असतात.
प्रस्ताव मंजूर करण्याची रीतच वेगळी असते. सर्वप्रथम टंचाईग्रस्त गावांचा प्रस्ताव ग्रामसेवकाद्वारे पंचायत समिती कार्यालयात आणून दिले जातात. त्यानंतर संबंधित लिपिक तो प्रस्ताव गटविकास अधिकारी यांची स्वाक्षरी घेऊन तहसील कार्यालयात तहसीलदारांकडे पाठवितात. असे ४-५ प्रस्ताव आल्यानंतर व्हेरिफिकेशन करण्यासाठी वर दर्शविलेल्या समितीचे तीन सदस्य टंचाईग्रस्त गावांचा दौरा करतात. त्या दौऱ्यात त्यांना पाण्याचे स्रोत आढळून आल्यास प्रस्ताव नाशिकला न पाठविता परस्पर तहसीलदार स्तरावरच नामंजूर करण्यात येतो. पण प्रस्तावात तथ्य आढळल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात तो पाठविला जातो. यामध्ये कालापव्यय होऊन तहानलेल्या गावांना किमान महिनाभराने टँकर सुरू करण्यासाठी त्र्यंबक पंचायत समितीला मंजुरी मिळते. अंमलबजावणी मात्र पंचायत समिती करते. त्यापेक्षा प्रस्ताव न दिलेला बरा.
तालुक्यातील अनेक योजना धूळ खात पडल्या असून, भारत निर्माणच्या योजना तर स्थानिक पाणीपुरवठा समित्यांनीच गुंडाळल्या आहेत. शासनाचा निर्णय तसा स्तुत्यच होता. तुमच्या गावची योजना तुम्हीच करा. त्यासाठी निधी घ्या. समित्यांनी निधी घेतला अन् योजना मात्र बारगळवली. मात्र यामुळे तालुक्यातील टंचाई परिस्थितीची वाताहत झाली आहे. तालुक्यात पाण्याची गंभीर समस्या निर्माण होत आहे. खेड्या-पाड्यांवर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने या समस्येवर उपाययोजना करण्याचे निवेदन आठ दिवसांपूर्वी श्रमजीवीतर्फे देऊनही अनेक दिवसांपासून सोमनाथनगर, वेळे, साप्ते या गावांचे प्रस्ताव देऊनही टँकर न मिळाल्याने तसेच कोणे धरणात पाण्याचा पुरेसा साठा असतानाही नागरिकांना पाणी मिळत नाही. पाण्याची कोणतीही सोय केली नसल्याने ग्रामस्थ पाण्यासाठी दाहीदिशा फिरत आहेत. त्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेने भगवान मधे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती कार्यालयावर शेकडो महिला व पुरु षांसह भर उन्हात हंडा मोर्चा काढला होता. तीव्र पाणीटंचाई असूनही लोकप्रतिनिधी व प्रशासनाची असंवेदनशीलता पाहून महिलांनी चार तास कडक उन्हात पंचायत समिती कार्यालयासमोर बसून निषेध व्यक्त करत पाणीटंचाईचा जाब विचारला.
एवढेच नव्हे तर ज्यावेळेस गटविकास अधिकारी यांनी मोर्चेकऱ्यांना पाचारण केले त्यावेळेस ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता चुकीची माहिती देऊ लागले. त्यावेळेस उपस्थित महिला अक्षरश: रणरागिणी बनून पोटतिडकेने इंजिनिअर खोटी माहिती देत असून, त्यांचे म्हणणे खोडून काढले.
शासकीय निधीतून नागरिकांसाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना आखल्या जात आहेत. पण या योजना केवळ कागदावर आहेत. त्यामुळे गाव-पाड्यातील महिलांना पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागते. या महिलांनी गटविकास अधिकारी व तहसीलदार यांच्यासमोर वस्तुस्थिती मांडली. या आंदोलनात महिलांसह पुरुषही हंडे घेऊन सहभागी झाले होते. टाके देवगाव येथील पाणीपुरवठा योजनेतून काही ठरावीक लोकांकडून पाणीचोरी होत असल्याने त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. भगवान मधे, संतू ठोंबरे, रामराव लोंढे, तानाजी शिद, तुकाराम लचके आदींसह शेकडो महिला व पुरु ष मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी तहसीलदार महेंद्र पवार, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, उपसभापती रवींद्र भोये यांनी मोर्चेकऱ्यांना पाणीटंचाईबाबत केलेल्या उपाययोजनांबाबत माहिती देऊन पाणीटंचाईचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात आले आहेत व ते पुढील दोन दिवसात मंजूर होतील, असे सांगून समाधान करण्याचा प्रयत्न केला.