पंजाबच्या लव्हली युनिव्हर्सिटीतून १२० विद्यार्थी महाराष्ट्रात परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 03:46 PM2020-05-05T15:46:42+5:302020-05-05T15:59:36+5:30
लव्हली युनिव्हर्सिटीत शिक्षण घेणारे सुमारे १२० विद्यार्थी महाराष्ट्रात परतले असून नाशिक परिसरातील आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटी येथे सोमवारी (दि.४) त्यांचे आगमन झाले. या विद्यार्थ्यानासहा बसमधून त्यांच्या गावाकडे रवाना करण्यात आले असून ४५ विद्यार्थी उद्या महा महाराष्ट्रात पोहचणार आहे.
नाशिक : पंजाबच्या लव्हली युनिव्हर्सिटीत शिक्षण घेणारे सुमारे १२० विद्यार्थी महाराष्ट्रात परतले असून नाशिक परिसरातील आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटी येथे सोमवारी (दि.४) त्यांचे आगमन झाले. या विद्यार्थ्याना भुजबळ नॉलेज सिटी च्या बससमध्ये त्यांचा गावापर्यंत पोहचविण्यात येणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छान भुजबळ यांनी दिली आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी घरी परतल्यावर प्रशासनाने कोरोना संदर्भात दिलेल्या फिजिकल डिस्टन्ससह सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉक डाऊनमध्ये पंजाबच्या लव्हली युनिव्हर्सिटीत महाराष्ट्रातील १६५ विद्यार्थी अडकलेले होते. वैद्यकीय, कृषी, मॅनजमेंट, पीएचडी व इंजिनियरिंगचे शिक्षण घेत असलेल्या महाराष्ट्रातील या विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनात खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह, धिरज शर्मा, रविकांत वरपे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने पंजाब वरून नाशिकच्या मेट भुजबळ नॉलेज सिटी आडगाव नाशिक येथे सोमवारी ४ मे रोजी १२० विद्यार्थी आणण्यात आले आहे. त्यानंतर आज सकाळी १० वाजेच्या सुमारास माजी खासदार समीर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली मेट भुजबळ नॉलेज सिटीमधील सहा बसेसच्या माध्यमातून पालकमंत्री छगन भुजबळ, नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रातील विविध ठिकाणी सुखरूप पाठविण्यात आले. तर बुधवारी (दि.६) रात्री उर्वरीत ४५ विद्यार्थी दोन बसेसच्या माध्यमातून मेट भुजबळ नॉलेज सिटीत पोहोचणार असून त्यांनाही बसेसद्वारे त्यांच्या घरी सुखरूप पोहचविण्यात येणार आहे. काल आलेल्या १२० विद्यार्थ्यांना रात्री उशिरा भुजबळ नॉलेज सिटीच्या विद्यार्थी वसतीगृहात राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर सकाळी अल्पोपहार देऊन सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांना सहा बसेसच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात पाठविण्यात आले आहे. यामध्ये नागपूर-वर्धा-अकोला-बुलढाणा १६ औरंगाबाद-जालना-परभणी-लातूर १६, पुणे-२२ मुंबई-ठाणे-पालघर-रायगड १५ अनगर-बीड-उस्मानाबाद-सोलापूर २४ सातारा-सांगली-कोल्हापूर -रत्नागिरी १५ विद्यार्थी या सहा बसेसच्या माध्यमातून पाठविण्यात आले आहे. या सर्व बसेसमध्ये विद्यार्थ्यांना प्रवासात जेवणाची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून या सर्व बसेसचे संपूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, नाशिक आणि धुळ्यातील १२ विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचविण्यात आले आहे.