शहरात आज आढळले १२२ कोरोना रूग्ण; तीघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 08:13 PM2020-07-28T20:13:13+5:302020-07-28T20:14:23+5:30
सध्या जिल्ह्यात विविध रूग्णालयांत एकूण २ हजार ४१४ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. रूग्ण बरे होण्याचे सरासरी प्रमाण ७७ टक्के आहे.
नाशिक : कोरोनाचे संक्रमण शहरासह जिल्ह्यात अद्यापही सुरूच आहे. शहरात आज मंगळवारी (दि.२८) संध्याकाळी सात वाजेपर्यंत १२२ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले. तसेच जिल्ह्यात एकूण १६९ कोरोना रूग्ण मिळाले. त्यामुळे जिल्ह्याचा आकडा आता १२ हजार ६५७ इतका झाला आहे. आज जिल्ह्यात एकूण पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यापैकी तीघे शहरातील होते. मृतांचा जिल्ह्याचा एकूण आकडा आता ४७२ तर शहराचा एकूण मृतांचा आकडा २५६वर पोहचला आहे.
कोरोना आजाराचे संक्रमण वेगाने होत असले तरीदेखील नागरिकांमध्ये अद्यापही त्याबाबत फारसे गांभीर्य दिसून येत नाही. नागरिक गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळत नसून उपाययोजनांकडेही दुर्लक्ष करू लागले आहे. पोलीस आयुक्तालय हद्दीत सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे; मात्र या आदेशाचा अनेकांकडून दररोज भंग केला जातो. सार्वजनिक ठिकाणी अजूनही सर्रासपणे थूंकीच्या पिचकाऱ्या सोडल्या जातात, हे दुर्दैवच!
जिल्ह्यात मंगळवारी एकूण ४७३ कोरोनाबाधित रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले. शहरात विडीकामगारनगर, अशोकनगर सातपूर, सिडको, पेठरोड, हिरावाडी, पंचवटी, सावरकरनगर गंगापूररोड, नाशिकरोड, जेलरोड, समतानगर टाकळी, इंदिरानगर, म्हसरूळ आदी भागात कोरोनाबाधित रूग्ण अधिक मिळून आले.
सध्या जिल्ह्यात विविध रूग्णालयांत एकूण २ हजार ४१४ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. रूग्ण बरे होण्याचे सरासरी प्रमाण ७७ टक्के आहे. जिल्ह्यातील कोरोना संशयितांपैकी १ हजार १११ व्यक्तींच्या नमुन्यांचे अहवाल प्रगतीपथावर आहेत. जिल्ह्यात मंगळवारी नव्याने एकूण १,०१३ कोरोना संशयित रूग्ण आढळून आले. सर्वाधिक ५११ संशयित नाशिक शहरातील आहे.